ठाण्याची हवा पुन्हा बिघडली, हवेची गुणवत्ता १२२ ते १६० च्या आसपास
By अजित मांडके | Published: December 21, 2023 04:34 PM2023-12-21T16:34:56+5:302023-12-21T16:35:17+5:30
उपवन आणि तीनहात नाक्याची हवेची गुणवत्ता देखील खालावल्याचे चित्र असून घोडबंदर भागात मात्र हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसत आहे.
ठाणे : मागील काही दिवसापासून ठाण्यातील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा वर खाली होतांना दिसत आहे. त्यातही गुरुवारी हवेत धुलीकणांचे प्रमाण अधिक दिसून आले होते. तसेच सकाळ पासून हवा देखील प्रदुषित झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळ पासून वातावरण देखील काहीसे बिघडल्याचे दिसत होते. मागील काही दिवसात हवेतील प्रदुषणात पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या ठाण्याची हवेची गुणवत्ता १२२ ते १६० च्या आसपास आढळून आली आहे. उपवन आणि तीनहात नाक्याची हवेची गुणवत्ता देखील खालावल्याचे चित्र असून घोडबंदर भागात मात्र हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसत आहे.
मुंबई पाठोपाठ ठाण्यात हवेची गुणवत्ता खालावल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसात हवेच्या गुणवत्तेत अनेक वेळा चढ उतार दिसून आले आहेत. ठाण्यात विविध ठिकाणी आजच्या घडीला विविध विकास कामे सुरु आहेत. तसेच महापालिकेच्या माध्यमातून सिमेंट रस्त्यांची कामेही सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीचा त्रासही ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.
शहरातील वाढते प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यांची धुलाईची कामेही शहरात सुरु आहेत. वाढते हवेतील प्रदुषण कमी करण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ पासून महापालिकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार विकासकामांच्या ठिकाणी वाहतुक करणाºया वाहनांनी प्रदुषण रोखण्यासाठी उपाय न केल्याने वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ४०० हून अधिक गृहसंकुलांच्या साईडला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या अनुषगांने काही ठिकाणी विकासकांना आता प्रदुषण होणार नाही, या दृष्टीने काही प्रमाणात उपाय योजना केल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हाता नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदुषीत गटात मोडत आहे. त्यातही तीन हातनाका परिसरातील हवा मागील काही दिवसात सुधारली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु मागील काही दिवसात पुन्हा येथील हवेत बिघाड झाल्याचे दिसत आहे. तीन हात नाका येथील हवेची गुणवत्ता मागील काही दिवसात १०७ ते १५७ पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे.
दुसरीकडे उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक काही प्रमाणात बिघडतांना दिसत आहे. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारतांना दिसत नसल्याचे चित्र आहे. आजही येथील हवेची गुणवत्ता ९८ ते १८१ पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. घोडबंदर भागातील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. १९ डिसेंबर रोजी येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०४ एवढा होता. तर २० डिसेंबर रोजी ९७ एवढा आढळून आला. त्यामुळे घोडबंदरची हवा सुधरत असल्याचे चित्र आहे. सध्या ठाण्याचा एकूण निदेर्शांक १२२ इतका आढळून आला आहे. तर १९ डिसेंबर रोजी १४२ असा आढळून आला होता. याचाच अर्थ हवेचा गुणवत्ता निर्देशांक वर खाली होतांना दिसत आहे.
तारीख - हवेचा गुणवत्ता निर्देशांक
१४ डिसेंबर - १५१
१५ डिसेंबर - १६०
१६ डिसेंबर - १३६
१७ डिसेंबर - १२४
१८ डिसेंबर - १२८
१९ डिसेंबर - १४२
२० डिसेंबर - १२२