उल्हासनगरातील हवा झाली शुद्ध, देशात पटकावला दुसरा क्रमांक
By सदानंद नाईक | Published: April 29, 2023 06:12 PM2023-04-29T18:12:41+5:302023-04-29T18:14:09+5:30
उल्हासनगर : ज्या ठिकाणाहून दुर्गंधी सुरू होते, तेथून उल्हासनगर सुरू होते. अशी हेटाळणी होणाऱ्या शहराने, देशातील शुद्ध हवेच्या बाबतीत ...
उल्हासनगर : ज्या ठिकाणाहून दुर्गंधी सुरू होते, तेथून उल्हासनगर सुरू होते. अशी हेटाळणी होणाऱ्या शहराने, देशातील शुद्ध हवेच्या बाबतीत टॉप ११ शहरांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अकोला शहराला १० वे स्थान मिळाले. सर्वाधिक हवेच्या प्रदूषणात देशातील १० शहरात दिल्ली, नोएडा आणि महाराष्ट्रातील वसई विरार शहराचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या केंद्रीय वने, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमा अंतर्गत देशातील महापालिका, नगरपरिषद नगरपालिका यांना १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी दिला होता. उल्हासनगर महापालिकेस एकूण २५ कोटीचा निधी प्राप्त झाला. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, डॉ. सुभाष जाधव, पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत यांच्यामार्फत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पावर डस्ट स्विपिंग मशिन, मिस्ट स्प्रे मशिन खरेदी करून त्याचा वापर करण्यात आला. डंम्पिंग ग्राऊंड, ट्रॅफिक सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शहरातील चौकांमधील कारंजांची देखभाल-दुरुस्ती करणे, रस्त्यांवरील चौकात गार्डन तयार करणे, हवेची गुणवत्ता फलक प्रसिध्द करणे, रस्त्यांवरील खड्डे भरणे, कंपोस्ट पिट तयार करणे, इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी सीएनजी पंप, मशिन बसवुन मृत प्राण्यांचे अवशेष नष्ट करणे, वृक्ष लागवड करणे, इलेक्ट्रॉनिक बसेस खरेदी करणे, नागरीकांमध्ये जनजागृती करणे अशी विविध कामे हाती घेण्यात आली.
केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नरेश गंगवार यांच्या मार्फत दुरदृष्यप्रणालीद्वारे १८ एप्रिल २०२३ रोजी देशभरातील सर्व राज्यांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगरपालिका, नगरपरिषद व महापालिकांना देण्यात आलेल्या निधीतुन हाती घेण्यात आलेल्या, कामांचा व शहरातील हवेच्या गुणवत्तेत झालेला बदल याबाबत आढावा घेतला. सदर आढावा बैठकीमध्ये देशातील व राज्यांमधील शहरांपैकी उल्हासनगर शहरातील हवेची गुणवत्ता १५५ वरून ७७ म्हणजे ५० टक्के कपात झाल्याचे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात दर्शविण्यात आले. याची दखल घेऊन उल्हासनगरला मानाचे दुसरे स्थान जाहीर केले. तर वाराणसी शहर प्रथम स्थानावर आहे.
महापालिका टीमला श्रेय... आयुक्त शेख -
शहरातील हवेची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी शासनाकडून देण्यात येणा-या निधीचा योग्य वापर केल्यानेच, शहराने शुद्ध हवे बाबत देशात दुसरा क्रमांक पटकावला. याचे श्रेय टीम वर्कला जात असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.