ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली
By अजित मांडके | Published: March 26, 2024 04:01 PM2024-03-26T16:01:47+5:302024-03-26T16:02:15+5:30
मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निदेर्शांक सरासरी १२७ एवढा आढळला आहे.
ठाणे : एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचे समाधानकारक चित्र ठाण्यात दिसू लागले आहे. मागील काही दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळला आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निदेर्शांक सरासरी १२७ एवढा आढळला आहे.
शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. मेट्रोची, महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामेही सुरु आहेत. त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतुक कोंडी यामुळे प्रदुषणात वाढच होतांना दिसत होती. प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेने ७ नोव्हेंबर २०२३ पासून मार्गदर्शक तत्वे जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केल्याचेही दिसून आले. त्यानुसार विकासकामांच्या ठिकाणी प्रदुषण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना, रस्त्यांची धुलाई, आदींसह इतर उपाय योजना करण्यात आल्याने ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हाता नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदुषीत गटात मोडत आहे. त्यातही तीन हातनाका परिसरातील हवा मागील काही दिवसात सुधारली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तीन हात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५१ ते १३८ पर्यंत आला आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निदेर्शांक सुधारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमलीचा सुधारल्याचे चित्र दिसून आले. तर घोडबंदर भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील मध्यम प्रदुषित गटात मोडला आहे. त्यातही या तीनही ठिकाणचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक या महिन्यावर वर खाली अशा स्वरुपात बदलतांना दिसत आहे. परंतु मागील काही महिन्यांच्या तुलनेत हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारतांना दिसत आहे.
प्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तापसण्याबाबत सहा गट केलेले आहेत. यात हिरवा, पोपटी ,पिवळा, नारंगी, लाल आणि गडद तपकिरी या रंगाचा समावेश असतो. त्यात हिरवा रंग अति शुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर हलका हिरवा हा शुद्ध, पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध, नारंगी रंगात प्रदूषित तर लाल रंग असलेला परिसर अति प्रदूषित गटात मोडतो. तर गडद तपकिरी सर्वात जास्त प्रदूषित या गटात मोडतो. सध्या ठाणे शहर परिसर हा पिवळा रंगाच्या गटात येत आहे. या गटातील हवेचा गुणवत्ता निदेर्शांक हा १०१ ते २०० इतका असतो. एकंदरीत सध्या ठाणे शहरातील हवेचा गुणवत्ता निर्दशांक सरासरी १२७ इतका असल्याने तो मध्यम प्रदूषित गटात मोडत आहे.