भिवंडीत ग्राम पंचायत निवडणुकांचे वातावरण तापले, ५११ उमेदवारी अर्ज दाखल
By नितीन पंडित | Published: December 3, 2022 07:08 PM2022-12-03T19:08:02+5:302022-12-03T19:08:27+5:30
कोनगाव, कारीवली, कशेळीसह १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील पंचवार्षिक कालावधी समाप्त झालेल्या कोन,कारीवली,कशेळी या मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढ झालेल्या ग्रामपंचायती सह चौदा ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहेत. त्यामधील १४ सरपंच पदासाठी १७७ तर १४ ग्रामपंचायतीं मधील १४४ सदस्य पदासाठी ५११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शनिवारी विहित वेळेत दाखल केले आहेत.यामध्ये खानिवली ग्रामपंचायतिच्या सरपंच व सात सदस्य पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध घोषणा नंतर करण्यात येणार आहे. या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता केली जाणार आहे अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.
या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील कोन,कांबे,कारीवली,कशेळी,कासणे,दुगाड,अकलोली,कोपर या बहुचर्चित ग्रामपंचायतींचा समावेश आहे .७ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवधी असून त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्या पासूनच आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली असल्याने ग्राम पंचायत निवडणुकीचे वातावरण आजपासूनच तापले आहे. .