ठाणे जिल्ह्यातील मराठा समाजाचे मागासलेपण आता ३४२६ कर्मचारी शाेधणार!
By सुरेश लोखंडे | Published: January 21, 2024 04:25 PM2024-01-21T16:25:11+5:302024-01-21T16:25:34+5:30
या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
ठाणे : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार आता हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील शहरांसह गांवखेड्यांमधीाल मराठा समाजाचे मागासलेपण शाेधून त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हयात तब्बल तीन हजार १६८ प्रगणक व २५८ पर्यवेक्षक मिळून तब्बल तीन हजार ४२६ प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले आहेत. २३ ते ३१ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील या सर्वेक्षणाचे काम पूर्ण हाेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठा समाजाचे सर्वेक्षण योग्य प्रकारे करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या नोडल ऑफिसर, सहाय्यक नोडल ऑफिसर, तालुकास्तरावर नेमण्यात आलेले प्रशिक्षक त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी अशा एकूण २१ जणांना सुप्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूटमधील तज्ञ प्रशिक्षकांकडून २० जानेवारी रोजी आधीच प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता जिल्ह्यातील शहरांसह गांवखेड्यांमधील मराठा समाजाचे सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
या सामाजिक सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले हे प्रशिक्षक रविवारप्रमाणेच २२ जानेवारी रोजी तालुक्याच्या ठिकाणी
तालुकास्तरीय प्रशिक्षक,तालुक्यासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी जिल्ह्याभरातील तब्बल तीन हजार १६८ प्रगणक व २५८ पर्यवेक्षक मिळून तीन हजार ४२६ प्रशिक्षित कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त केले आहेत. आयोगाच्या सूचनांनुसार तालुकास्तरीय नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांकडून २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार असून या सर्वेक्षण कामकाजात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे.