भाजपने कलानी कुटुंबाला स्वप्न दाखवले, राष्ट्रवादीने मात्र प्रत्यक्षात आणले; जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 04:06 PM2022-02-19T16:06:30+5:302022-02-19T16:07:42+5:30
आव्हाड यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून पप्पु कलानी यांच्या जेल बाहेर येण्यामागे राष्ट्रवादी पक्षाचा हात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
उल्हासनगर : गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ओमी कलानी यांना वडिल जेल बाहेर येण्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र ते स्वप्न राष्ट्रवादीने पूर्ण केले, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष कार्यकारणीच्या कार्यक्रमात करून खळबळ उडून दिली. तसेच पक्षाचे कॅप्टन पद पंचम कलानी यांच्याकडे राहणार असल्याचे सांगून पक्षातील भारत गंगोत्री गटाला धोक्याचा इशाराही दिला.
उल्हासनगर महापालिकेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ओमी कलानी यांना भाजपने वडील पप्पु कलानी यांना जेल बाहेर काढण्याचे स्वप्न दाखवून वळवून घेतले होते. त्यामुळे भाजपची सत्ता महापालिकेवर आली होती. मात्र भाजपने दाखविलेल्या स्वप्नाची पूर्तता राष्ट्रवादीने केल्याची आठवण अंटेलिया येथील पक्ष कार्यकारणीच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी करून दिली. आव्हाड यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून पप्पु कलानी यांच्या जेल बाहेर येण्यामागे राष्ट्रवादी पक्षाचा हात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
पप्पु कलानी सलग चार वेळा आमदार पदी निवडून आले असून त्यांच्या नावा भोवती शहरातील राजकारण गेल्या तीन दशकांपासून फिरते. कलानी कुटुंबाच्या सहकार्यामुळेच भाजपची सत्ता महापालिकेवर आली होती, असेही आव्हाड म्हणाले.
महापालिका निवडणुकीपूर्वी घरवापसी केलेल्या कलानी कुटुंबातील पंचम कलानी यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ राष्ट्रवादी पक्षाने टाकली. तेंव्हापासून शहरात राष्ट्रवादी पक्षाचे वारे वाहत आहेत. तसेच माजी आमदार पप्पु कलानी जेल बाहेर आल्याने, कलानी यांच्या नावाची चर्चा आहे. शहाराध्यक्ष पदाची माळ पंचम कलानी यांच्या गळ्यात टाकल्यानंतरही, गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून पक्षाची कार्यकारणी जाहीर झाली नव्हती. शुक्रवारी अंटेलिया येथील सभागृहात जम्बो कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी आव्हाड यांनी भाजपसह मोदी व स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्यावर टीका केली. तसेच भाजप मुक्त उल्हासनगर, असा नारा देऊन महापालिकेवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचे संकेत दिले.
कार्यक्रमाला पप्पु कलानी गैरहजर?
राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. मात्र शहर कलानीमय करणारे पप्पु कलानी यांची कार्यक्रमाला असलेली अनुउपस्थिती सर्वांना खटकत होती. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक मैदानात कलानी उतरणार असल्याचे संकेत दिले.