धुलिवंदनावेळी बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह ७५ तासांनी आला पाण्याबाहेर; भिवंडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:51 AM2022-03-23T11:51:16+5:302022-03-23T11:51:27+5:30
भिवंडी : धुलिवंदन उत्सव साजरा करीत असताना भिवंडी तालुक्यातील पाये बामनपाडा येथील खदानीच्या तलावात पोहण्यास गेलेल्या व्यक्तीचा शोध तब्बल ...
भिवंडी : धुलिवंदन उत्सव साजरा करीत असताना भिवंडी तालुक्यातील पाये बामनपाडा येथील खदानीच्या तलावात पोहण्यास गेलेल्या व्यक्तीचा शोध तब्बल ७५ तासांनी लागला असून सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अरुण कोंडुस्कर असे पाण्यात बुडून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पाये येथे राहणारा आहे.
अरुण कोंडुस्कर हे टीएमटीमध्ये वाहक म्हणून काम करीत होते. धुलिवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास ते आपल्या मित्रांसह ब्राह्मणपाडा येथील खदानीतील तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर ते बाहेर आलेच नाहीत. त्यानंतर त्यांची शोधाशोध केली. तरीही ते सापडले नसल्याने भिवंडी अग्निशामक दलास पाचारण केले. परंतु, रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. शनिवारी पुन्हा अग्निशामक दलासह शहापूर येथील जीवरक्षक पथक यांना बोलावून शोध घेतला. परंतु त्यास यश न आल्याने अखेर रायगड येथून समुद्रात स्कुबा डायव्हिंग करणारे पथक शोध मोहिमेसाठी रविवारी पाचारण केले. त्यांनी रविवारी दुपारपासून शोध सुरू केला. परंतु शोध लागू शकला नव्हता. अखेर सोमवारी तलावातील पाण्यास जेसीबीच्या साहाय्याने वाट मोकळी करून दिली असता सोमवारी रात्री तलावातील पाणी कमी झाल्यावर अरुण यांचा मृतदेह पाण्याबाहेर आला. त्यानंतर तालुका पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. या दुर्घटनेनंतर कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.