पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

By अजित मांडके | Published: September 9, 2022 02:27 PM2022-09-09T14:27:26+5:302022-09-09T14:28:32+5:30

अतिवृष्टीमुळे कळवा भास्करनगर येथील डोंगरावरील पाण्याचा मोठा प्रवाह डोंगरजवळील चाळीत शिरला.

The body of the child was found washed away in the water stream in thane | पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

googlenewsNext

ठाणे - गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळवा, भास्कर नगर जवळील डोंगरावरून आलेला पाण्याचा मोठा प्रवाह भास्कर नगर येथील मारुती चाळीत घुसला. त्यावेळी, त्या पाण्याच्या प्रवाहात अभी सिंह मौर्या हा ४ वर्षीय चिमुरडा वाहून गेला होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी राहत्या घरापासून ५०० मीटर अंतरावरील मफतलाल कंपनीजवळील नाल्यात सापडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

 गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळवा भास्करनगर येथील डोंगरावरील पाण्याचा मोठा प्रवाह डोंगरजवळील चाळीत शिरला. याचदरम्यान अभी सिंह मौर्या हा चिमुरडा पाण्याचा प्रवाहासोबत वाहून गेल्याची शक्यता तेथील स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे. तथापि प्रत्यक्ष दर्शनी कोणीही ठामपणे सांगत नव्हते. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त  व कळवा पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळ भास्कर नगरमधून मफतलाल कंपाऊंडकडे जाणारा नाला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्यामार्फत सुमारे ०३-तास नाल्यामध्ये शोधकार्य करण्यात आले. मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कळवा वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या आदेशानुसार शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी सकाळी ०८:३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा शोधकार्याला सुरू झाली. त्यानंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांतच त्या चिमुरड्याचा मृतदेह मफतलाल कंपनीजवळील नाल्यात सापडला. तो मृतदेह पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

ठाण्यातील नाल्यात आढळला मृतदेह 

ठाणे येथील ज्ञानेश्वरनगर नाल्यामध्ये एका अनोळखी ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. तो मृतदेह नाल्यातून बाहेर काढून वागळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर तो मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली होती. त्या इसमाचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला आहे हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. पुढील तपास वागळे इस्टेट पोलीस करत आहेत.
.....
 

Web Title: The body of the child was found washed away in the water stream in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.