दिवा फाटकावरील पूल मार्च २०२३ पर्यंत लागणार मार्गी; दोन आठवड्यात ९ इमारती पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 03:23 PM2022-06-14T15:23:25+5:302022-06-14T15:25:02+5:30

ठाणे : दिवा येथे रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आता येथे रखडलेल्या फाटकावरील उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा वेग आला ...

The bridge over Diva Phatka will be completed by March 2023; 9 buildings will be demolished in two weeks | दिवा फाटकावरील पूल मार्च २०२३ पर्यंत लागणार मार्गी; दोन आठवड्यात ९ इमारती पाडणार

दिवा फाटकावरील पूल मार्च २०२३ पर्यंत लागणार मार्गी; दोन आठवड्यात ९ इमारती पाडणार

googlenewsNext

ठाणे : दिवा येथे रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आता येथे रखडलेल्या फाटकावरील उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा वेग आला आहे. ठाणे महापालिकेने या पुलाआड येणाऱ्या उर्वरित नऊ इमारती पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारती पाडल्यानंतर येथील काम सुरू होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तर, रेल्वेकडील बाजूचे कामही रेल्वेकडून सुरू झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान, पुलाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.

दिवा येथे रेल्वे रुळ ओलांडताना यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे येथील फाटक बंद करून पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचा प्रत्येकी ५० टक्के खर्च पालिका व रेल्वे करीत आहे. त्यानुसार पालिकेकडील खर्चाचे काम ३८.९० कोटींचे इतके आहे. पुलाची पूर्व आणि पश्चिम बाजूकडील मिळून लांबी ७३९.१५ मीटर इतकी आहे. या पुलाच्या कामास जून २०१९ मध्ये कार्यादेश दिला असून, आतापर्यंत २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. कोरोनाचा फटका या कामालाही बसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या पुलाच्या कामाअंतर्गत पूर्व आणि पश्चिम बाजूकडील जाण्या-येण्यासाठी ७.४० मीटर रुंदीची मार्गिका तसेच पादचाऱ्यांसाठी २.५० मीटर रुंदीचे दोन्ही बाजूस पदपथ तयार करण्यात येत आहेत.

१८ इमारतीत २२५ सदनिका होणार बाधित

दिवा येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूस बहुमजली इमारती बाधित होत आहेत. पालिकेने पहिल्या टप्प्यात म्हणजेच मागील दिवाळीच्या आधी पूर्वेतील नऊ इमारती तोडल्या होत्या. आता शिल्लक असलेल्या नऊ इमारतींपैकी सहा इमारती या तळ अधिक चार मजली, तर तीन इमारती तळ अधिक एक मजल्याच्या आहेत. एकूण १८ इमारतींमध्ये २२५ सदनिका बाधित होणार आहेत. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यातील कारवाई दोन आठवड्यात सुरू केली जाणार आहे. येथील रहिवाशांचे एक महिन्याआधी इतरत्र पुनर्वसन केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेकडून पूर्वेकडील बाजूस पिलर उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. येथील शिल्लक इमारतींवरील कारवाई दोन आठवड्यात पुन्हा सुरू केली जाणार आहे. तसेच या पुलाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.

- प्रशांत सोनाग्रा, नगर अभियंता, ठाणे महापालिका

Web Title: The bridge over Diva Phatka will be completed by March 2023; 9 buildings will be demolished in two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे