बसला चार्जिंग नसल्याने बस धावलीच नाही, उल्हासनगर महापालिकेवर ओढवली नामुष्की
By सदानंद नाईक | Published: March 11, 2024 06:42 PM2024-03-11T18:42:44+5:302024-03-11T18:42:56+5:30
उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस सेवा सुरू करणार असल्याचा गाजावाजा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू होता. अ
उल्हासनगर : महापालिका परिवहन बससेवेचे मोठा गाजावाजा करीत धुमधडाक्यात रविवारी लोकार्पण करण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी चार्जिंग अभावी बस रस्त्यावरून धावल्याच नसल्याची नामुष्की महापालिकेवर ओढविली आहे. या भोंगळ कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस सेवा सुरू करणार असल्याचा गाजावाजा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू होता. अखेर परिवहन बससेवेचे रविवारी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आदींच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर खासदार शिंदे, आमदार किणीकर, आयुक्त अजीज शेख यांच्यासह महापालिका अधिकारी, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बस मधून फेरफटका मारला. तसेच खासदार शिंदे व इतरांनी बसची तिकिटे काढून सोमवर पासून नियमित बससेवा सुरू राहणार असल्याचे सांगितल्याने, नागरिकांनीही आनंद व्यक्त केला. मात्र सोमवारी महापालिका परिवहन बस रस्त्यावर उतरल्या नसल्याने, नागरिकांत चुळबुळ सुरू झाली.
महापालिकेच्या सर्व बसेस ई-बस असल्याने, बसला चार्जिंग करावी लागते. मात्र त्याक्षमतेचे चार्जिंग सुविधा महापालिका चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध नसल्याने उघड झाले. त्यामुळे बसची चार्जिंग झाली नाही. त्याभावी बसेस सोमवारी रस्त्यावरून धावू शकल्या नाही. महापालिका मुख्यालय मागे उभारलेल्या चार्जिंग स्टेशनवर बसला लागणारी चार्जिंग क्षमता उपलब्ध नसल्याने, पुण्यावरून त्या क्षमतेची चार्जिंग मागून घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे. प्रत्यक्षात मुख्यालय मागील चार्जिंग स्टेशन बसच्या क्षमतेचे बनविण्यात आले नाही. असे बोलले जात आहे. शहाड डेपो येथे चार्जिंग स्टेशन बनविण्यात येणार आहे. मात्र त्याठिकाणी अद्यापही रोहित्र बसविले नसून उभारलेल्या शौचालयात साधे पाण्याची सुविधा नाही. बसच्या साफसफाई व दुरुस्तीसाठी रॅम बनविण्यात आला नसून बस धुण्याचे कोणतीही सुविधा नाही. रिजेन्सी, उल्हासनगर रेल्वे स्टेशन पश्चिम आदी ठिकानी बस डेपोच्या कामाला मुहूर्त नाही. याशिवाय अन्य सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
महापालिका परिवहन सेवेवर प्रश्नचिन्हे
महापालिका परिवहनची ९ मीटर लांबीची एक बस कमीतकमी १६० चालविने आवशक आहे. त्यापेक्षा बस कमी धावली तरी महापालिकेला परिवहन बससेवा चालविण्यासाठी ठेकेदाराला दर किलो प्रमाणे ५२.७५ रुपये अदा करावे लागणार आहे. तो भुदंड महापालिकेवर बससेवेच्याद्वारे सुरू झाला आहे.