रस्त्यावरील पाण्याचा अंदाज चुकल्याने कार तलावत बुडाली; चालक थोडक्यात बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 11:13 AM2022-07-12T11:13:32+5:302022-07-12T11:20:01+5:30
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत सोमवारी रात्री फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे
ठाणे : रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने फडकेपाडा तलावामध्ये कार दिवा,खर्डीगाव, येथील फडकेपाडा तलावामध्ये बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत, कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तर मुंबई चेंबुर येथील कारचालक युसुफ पठाण याला तेथील दक्ष व स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढून जीवनदान दिले.
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत सोमवारी रात्री फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन केंद्राचे जवान १-फायर वाहन, १-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. त्यावर}तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनांमधील चालक युसुफ पठाण (२८ ) याला तेथील स्थानिक नागरिकांनी सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढले व वाहनांमध्ये इतर कोणीही व्यक्ती नसल्याची माहिती स्वतः वाहन चालकाने दिली. त्यानंतर शीळ पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनाला रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढून वाहन चालकाच्या ताब्यात दिले. रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने तलावामध्ये गेल्याची माहिती चालकाने दिली. ही कार मे. रजा एंटरप्राइजेस नामक कंपनीच्या मालकीची असल्याचे चालकाने सांगितले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.
ठाणे - रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने फडकेपाडा तलावामध्ये कार बुडाली #Thanepic.twitter.com/EyoTHnX7qZ
— Lokmat (@lokmat) July 12, 2022