मुख्यमंत्रीच अज्ञातस्थळी... सर्व मंत्री अन् खासदार एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी
By अजित मांडके | Published: March 29, 2024 09:22 PM2024-03-29T21:22:10+5:302024-03-29T21:23:26+5:30
ठाण्यातील निवासस्थानी मंत्री खासदार तीन तास मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत
ठाणे : रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा जागेचा महायुतीतील तिढा अदयाप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत तसेच आमदार सुहास कांदे हे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते. मात्र मुख्यमंत्री हे उपस्थितीत नसल्याने त्यांची कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाली. मात्र ही भेट राज्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात होती. त्यावरच चर्चा झाली अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.
शुक्रवारी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे,रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली. मुख्यमंत्री अज्ञात स्थळी असल्याने तब्बल तीन तास सर्वच मंत्री आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तात्काळत बसावं लागलं. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत, नाशिक येथील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे ही उपस्थित होते. दरम्यान या भेटीनंतर बोलतांना म्हस्के म्हणाले की राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत. तिथे प्रचाराचे नियोजन करण्यासाठी ही बैठक होती. त्यात प्रचार यंत्रणा कशी राबवायची यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत. त्या मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यावर महायुतीतील वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. तर नाशिक लोकसभेची जागा पारंपरिक शिवसेनेची आहे. त्यामुळे ती आमच्याच वाट्याला येईल. आमचा आमच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे यांनी दिली. तसेच लोकशाहीत कोणालाही कोणत्याही जागेवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे छगन भुजबळ यांनी तसा दावा केला असेल. पण नियमाप्रमाणे ती जागा शिवसेनेच्या वाट्याला येईल. त्यानुसार तिथे कशी प्रचारयंत्रणा राबवायाची यांसंदर्भात आम्ही आज चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. तर किरण सामंत यांनी मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे यावेळी टाळले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आज दिवसभर ठाण्यात असूनही ठाण्यातील निवासस्थानी आलेल्या मंत्र्यांची भेट घेणं त्यांनी टाळलं नक्की ही भेट घेणं का टाळलं असावं हे जरी गुलदस्तात असलं तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं आहे काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.