मुख्यमंत्री गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत; आ. गायकवाड यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 09:20 AM2024-02-04T09:20:48+5:302024-02-04T09:21:03+5:30

आ. गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप

The Chief Minister is trying to create a state of criminals; come Gaikwad's serious allegations | मुख्यमंत्री गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत; आ. गायकवाड यांचे गंभीर आरोप

मुख्यमंत्री गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत; आ. गायकवाड यांचे गंभीर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : पोलिस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार बनवले आहे, असे अनेक गंभीर आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या सगळ्याचा मला मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केली. होय, मी गोळ्या झाडल्या. मला काहीही पश्चात्ताप झालेला नाही. 

माझ्या मुलाला जर पोलिस स्टेशनमध्ये बोलावून मारत असतील, तर मी काय करणार? असा सवाल करून ते म्हणाले, पोलिसांनी हिंमत करून त्याला पकडले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तो वाचला. मी त्याला जिवे मारणार नव्हतो, पण जर माझ्यावर पोलिसांच्या समोर हल्ला होत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणे भाग आहे. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार ठेवले आहेत. त्यांनी दुसऱ्याचे आयुष्य खराब करायला घेतले आहे, मी माझ्या पक्षातील वरिष्ठांना बऱ्याच वेळा हे सांगितले होते, असे अनेक गंभीर मुद्दे त्यांनी यावर बोलताना मांडले आहेत.
हे लोक वारंवार माझा अपमान करतात. माझा आमदार निधी वापरला जातो. खासदार श्रीकांत शिंदे जबरदस्तीने तेथे स्वतःच्या नावाचे बोर्ड लावतात. प्रत्येक वेळी हे मी सांगितले होते. ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला, त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचे बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. त्या जागामालकाला दोन-तीन वेळा मी पैसे दिले; पण ते सह्या करण्यासाठी येत नव्हते. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. कोर्टातून केस जिंकलो. त्यानंतर सातबारा आमच्या कंपनीच्या नावाने झाला. तेव्हा-तेव्हा महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने आमच्या जागेवर कब्जा केला. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना असे करू नका, अशी विनंती केली होती. तुम्ही कोर्टात जा. कोर्टातून ऑर्डर आणली तर आम्ही लगेच जागेचा ताबा तुम्हाला देऊन टाकू; पण तुम्ही दादागिरी करू नका, अशी विनंती मी त्यांना केली होती.
पण त्यानंतरही त्यांनी दादागिरी केली. शुक्रवारीही कंपाऊंड तोडून ते आतमध्ये आले. पोलिस स्टेशनच्या मध्येही चार-पाचशे लोकांना घेऊन महेश गायकवाड आले होते. माझा मुलगा पोलिस स्टेशनमधून बाहेर जात होता. तेव्हा त्याला त्यांनी धक्काबुक्की केली. मला ते सहन झाले नाही. याचा मला अजिबात पश्चात्ताप झालेला नाही. 

आमदार गायकवाड पुढे असेही म्हणाले की, मी एक व्यावसायिक माणूस आहे; पण माझे आयुष्य खराब होत असेल, माझ्या मुलांना कोणी काही करत असेल, गुन्हेगार त्याला मारत असतील तर मी शांत बसणार नाही. एक बाप म्हणून मी कदापिही सहन करू शकत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. आता ते बीजेपीसोबत देखील गद्दारी करणार आहेत. माझे त्यांच्याकडे करोडो रुपये बाकी आहेत. ते जर देवाला मानत असतील तर त्यांनी देवाची शपथ घेऊन सांगावे की, माझे त्यांच्याकडे किती पैसे बाकी आहेत? गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊनसुद्धा ते माझ्याविरुद्धच काम करत आहेत, असा आक्षेप घेत आता कोर्टाचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे, असेही त्यांनी सांगितले. 

ते बीजेपीला संपवण्याचे काम करत आहेत

 महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घ्यायचा आहे, तो घेतील; पण माझा निर्णय ठाम आहे. शिंदे यांनी महाराष्ट्रात गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट लावायला घेतली आहे. 
 महाराष्ट्र पुन्हा चांगला ठेवायचा असेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल. हीच माझी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, असे सांगत गायकवाड म्हणाले, मी वालधुनीमध्ये साधी लायब्ररी बनवली होती. त्याचे उद्घाटनही झाले नाही. 
 तिथे श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचा बोर्ड लावला. हे लोक किती खालच्या थराला जाऊन काम करत आहेत, हे लक्षात येते. बीजेपीला संपवण्याचे काम हे लोक करत आहेत. मी गुन्हेगार नाही, हे जनतेला माहीत आहे. 
 मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला आहे. जनता मला चांगल्याप्रकारे ओळखून आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि पुढेही राहील, असेही गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: The Chief Minister is trying to create a state of criminals; come Gaikwad's serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.