हात भाजलेल्या लहानग्या रुद्रांशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:22 AM2024-05-06T06:22:30+5:302024-05-06T06:22:43+5:30
म्हस्के यांची प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला पाहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली रविवारी किसननगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी एक आई आपल्या जखमी मुलाला घेऊन रस्त्याने चाललेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिसली. त्या आईच्या खांद्यावर एक मूल, तर दुसरे मूल हातात होते. मुख्यमंत्र्यांनी त्या माउलीची अडचण जाणून घेत रॅली सोडून ते तिच्या मदतीला धावून गेले. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा आगळा-वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला.
म्हस्के यांची प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला पाहिले. त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्याच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले. रुद्रांश रोनित चौधरी असे या नऊ वर्षांच्या मुलाचे नाव होते. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले.
रुद्रांश चौधरी या जखमी मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्याच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले.