सफाई कामगारांच्या मेहनतीने 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला मिळणार बळ
By जितेंद्र कालेकर | Published: September 1, 2023 06:02 PM2023-09-01T18:02:42+5:302023-09-01T18:03:53+5:30
सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागृकता यातून 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला.
ठाणेे: ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईचे नवीन पर्व १ सप्टेंबरपासून सुरू झाले. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता पातलीपाडा येथील सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन त्रिकोणी झाडू, कचरा वाहून नेण्यासाठी नवीन डबे यांची पूजा केली. त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला आणि त्यानंतर सर्व सफाई कर्मचारी त्यांच्या हद्दीतील रस्ते सफाईच्या कामासाठी रवाना झाले.
सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागृकता यातून 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला. पातलीपाडा येथील हजेरी शेड येथे बांगर यांच्यासह अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपयुक्त तुषार पवार उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या हजेरी शेड येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. ओवळा येथे नवीन गट सुरू करण्यात आला.
रस्ते सफाईच्या दोन्ही वेळांचे स्वच्छता निरीक्षक आणि कंत्राटदार यांनी तंताेतंत पालन करावे. हजेरी शेडवरील उपस्थिती आणि प्रत्यक्ष कामावरील कर्मचारी यांचा दैनंदिन अहवाल स्वच्छता निरीक्षकांनी नियमित दयावा. सकाळी ६ नंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही कंत्राटदाराची राहील. वारंवार असा प्रकार झाल्यास संबंधित स्वच्छता निरिक्षकांसह इतर अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. वेळा तपासण्यासाठी लवकरच बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीची व्यवस्थाही केली जाणार आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाबाबतच्या सर्व बाबी प्रशासनाकडून प्राधान्याने मार्गी लावल्या जातील. मात्र, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही बांगर यांनी दिला.
रस्ते स्वच्छतेबद्दल नागरिकांचा प्रतिसाद ही महत्वाचा आहे. त्यासाठी विभागवार नागरिकांचे गट तयार करता येतील. स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. त्याचबरोबर, दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या प्रथम इशारा द्यावा नंतर दंडाची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कर्मचाऱ्यांशी संवाद-
पातलीपाडा येथील हजेरी शेडमध्ये आयुक्त बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हातमोजे वापरताना काही अडचणी येतात का? त्याचा उपयोग होताे का? असे विचारल्यावर, घाण काढताना, गवत काढताना हातमोजे उपयोगी पडतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. उपस्थितीसह पगाराच्या वेळेबद्दलही आयुक्तांनी विचारणा केली. कामगारांचे पगार वेळेत झाले पाहिजेत, प्रत्येक हजेरी शेडवर कामगार संख्या, गटाचे नाव, कंत्राटदार याचे नाव सफाईच्या वेळा यांच्या िवभागाचा ठळक उल्लेख करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.