उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या मुलांना मिळणार ४ वर्षानंतर हक्काचे छत
By सदानंद नाईक | Published: September 14, 2022 05:28 PM2022-09-14T17:28:41+5:302022-09-14T17:30:49+5:30
उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागा मार्फत मराठी, हिंदी व गुजराती माध्यमाच्या एकून २८ शाळा आहेत.
उल्हासनगर - महापालिका शाळा क्रं-१८ व २४ मधील हजारो विध्यार्थ्यांचा ४ वर्षाचा वनवास संपून त्यांना हक्काचे शाळेचे छत मिळणार आहे. शाळेच्या इमारतीला बांधकाम परवानगी दिल्याची माहीती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली असून पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी इमारत बांधण्यात येणार. असा विश्वास अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी व्यक्त केला.
उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागा मार्फत मराठी, हिंदी व गुजराती माध्यमाच्या एकून २८ शाळा आहेत. एकेकाळी १५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या महापालिका शाळेतील विद्यार्थी संख्या घटून साडे चार हजारावर आली. दरम्यान सन २०१८ मध्ये महापालिकेचे कोणतेही नियोजन नसतांना पुनर्बांधणीच्या नावाखाली खेमानीं परिसरातील शाळा क्रं.१८ व २४ ची इमारत जमीनदोस्त केली. दोन्ही शाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थीचे हक्काचे छत जाऊन, त्यांच्यावर एका खाजगी शाळेच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरविण्याची वेळ आली. एका वर्षा ऐवजी ४ वर्ष उलटून जाऊनही शाळा इमारतीची एक वीट बांधकाम झाले नसल्याने, महापालिकेला टीकेचा वर्षाव सुरू झाला.
दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, प्रवीण माळवे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे कमलेश निकम यांनी आक्रमक भूमिका घेऊन शाळा इमारतीची पुनर्बांधणीची मागणी लावून धरली. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचा शहर दौरा लक्षात घेऊन, राष्ट्रवादीचे कमलेश निकम यांनी शाळेच्या मुलांना एकत्र आणले. मुलांची भेट मंत्रीमहोदय यांच्याशी घेऊन शाळेची समस्या मांडण्याचे ठरविले. निकम यांच्या भेटीपूर्वीच भाजपचे आमदार कुमार आयलानीसह अन्य पदाधिकार्यांनी स्वतःहून शाळेची समस्या मंत्रीमहोदय यांच्या समोर मांडली. त्यानंतर सूत्र हलून महापालिका नगररचनाकार विभागाकडून शाळा इमारत बांधकामाला मंजुरी दिल्याची माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली. तसेच शाळेच्या बांधणीला गती येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. मात्र यासर्व प्रकाराने महापालिका शिक्षण व बांधकाम विभागातील सावळागोंधळ उघड झाला.
आयुक्त व नगररचनाकारांचे कौतुक
गेल्या चार वर्षांपासून महापालिका शाळेचे हजारो विद्यार्थी खाजगी संस्थेच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. मात्र आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी तत्परतेने खाजगी वास्तुविशारदाकडून शाळा बांधकाम नकाशा बनवून घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याने, आयुक्त शेख, अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर व नगररचनाकार मुळे यांचे कौतुक होत आहे.