घोडबंदर भागातील नागरिकांना पुन्हा कोंडीचा मनस्ताप
By अजित मांडके | Published: December 22, 2023 04:58 PM2023-12-22T16:58:09+5:302023-12-22T16:58:30+5:30
सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह शाळकरी मुलांना लेट मार्क सहन करावा लागला.
ठाणे : घोडबंदर भागातील नागरिकांना मागील काही महिन्यापासून वाहतूक कोंडीला या ना त्या निमित्ताने सामोरे जावे लागत आहे. त्यात शुक्रवारी सकाळी घोडबंदर भागातील गायमुख भागात एकाच वेळेस तीन ट्रेलर बंद पडल्याने त्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. काही वाहन चालकांनी या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चुकीच्या दिशेने वाहने टाकल्याने त्यामुळे दुसऱ्या बाजूकडील रस्त्यावर देखील कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह शाळकरी मुलांना लेट मार्क सहन करावा लागला. सकाळी ११ सुमारास वाहतुक पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. परंतु वाहन चालकांना सुमारे ५ तास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले.
घोडबंदर भागात सध्या मेट्रोच्या कामाने वेग धरल्याने या भागात रस्त्याच्या मधोमध पिलर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्याच्या आणि घोडबंदरच्या दिशेने जातांना सकाळ, दुपार आणि सांयकाळच्या सुमारास वाहतुक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यात शुक्रवारी तीन ट्रेलर घोडबंदर भागातील गायमुख भागात एकाच वेळेस बंद पडल्याने वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास घोडबंदर येथील गायमुख घाटातून गुजरातच्या दिशेने जाणारे तीन ट्रेलर एकाच वेळी बंद पडले. त्यातील दोन ट्रेलर एकाच भागात तर, दुसरा ट्रेलर त्यापासूनच काही अंतरावरील दुसºया भागात बंद पडला. यामुळे या मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाली. अनेक चालकांनी गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी बाजूच्या ठाणे मार्गिकेवरून विरुद्ध दिशेने वाहन नेण्यास सुरूवात केली. यामुळे ठाणे बाजूकडे येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन या मार्गिकेवरही कोंडी झाली.
कासारवडवली, आनंदनगरपर्यंत वाहनांच्या रांगा पोहचल्या होत्या. त्यात सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांसह शाळकरी मुलांचे यात हाल झाल्याचे दिसून आले. त्यात बंद पडलेले ट्रेलर हटविण्याबरोबर येथील कोंडी सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांसह स्थानिकही रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. परंतु ही वाहने कोंडीत अडकल्याने नोकरदार वगार्चे हाल झाले. अनेकांना कामावर पोहचण्यास उशीर झाला. घोडबंदर येथील मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गांवरही कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने तीन ट्रेलर बाजूला केले आणि त्यानंतर वाहतूक सुरू झाली. दुपारी ११ वाजेपर्यंत ही कोंडी कायम होती. हि कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली. त्यानंतर हळू हळू वाहतुक पूर्वपदावर येऊ लागल्याचे दिसत होते. परंतु दुपारी १२ वाजल्यापासून पुन्हा अवजड वाहनांची वाहतुक सुरु झाल्याने घोडबंदरवरुन ठाण्याच्या आणि नाशिकच्या दिशेने येणाºया वाहनांच्या रांगा माजिवड्यापासून ते थेट पातलीपाड्यापर्यंत गेल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीचा वेग पुन्हा मंदावल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी १ ते दिडनंतर ही वाहतुक काहीशी पूर्वपदावर आल्याचे सांगण्यात आले.
गायमुख भागात एकाच वेळेस तीन ट्रेलर बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यात काहींनी आपली वाहने ही दुसºया मार्गीकेने चुकीच्या दिशेने घातल्याने त्यामुळे देखील कोंडी झाली होती. परंतु ९.३० वाजेनंतर ही वाहतूक हळू हळू पूर्वपदावर करण्यात आली.
(डॉ. विनयकुमार राठोड - पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा)