वरसावेतील खाडी पुला लागत होणार शहरातले पहिले कांदळवन उद्यान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 11:30 PM2022-07-08T23:30:29+5:302022-07-08T23:33:12+5:30
वरसावे नाका येथे पुला लगतच्या खाडी किनारी मेरीटाईम बोर्डा कडून प्रवासी जेट्टी विकसित केली जात आहे
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीतली वरसावे नाका खाडी पुलालगत जेट्टी व चौपाटीसह शहरातील पहिले कांदळवन उद्यान विकसित केले जाणार आहे. चौपाटी विकासासाठी १० कोटींचा खर्च असून त्यातील ५ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
वरसावे नाका येथे पुला लगतच्या खाडी किनारी मेरीटाईम बोर्डा कडून प्रवासी जेट्टी विकसित केली जात आहे. जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात असुन प्रवासी तसेच पर्यटकांचा विचार करून गेम झोन, जेट्टीपर्यंत जाण्यासाठी रस्ता, उद्यान व सुशोभीकरण अशी कामे येथे करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. ह्या परिसरात कांदळवन क्षेत्र असल्याने कांदळवनची माहिती व महत्व नागरिकांसह विद्यार्थ्यांना व्हावे म्हणून कांदळवन उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव आ. सरनाईक यांनी दिला होता. त्या अनुषंगाने चौपाटीसह कांदळवन उद्यानसाठी 'महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास' या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून ५ कोटींचा पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहे. मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह आ. सरनाईक यांनी परिसराची स्थळपाहणी केली.
निसर्गाच्या जैवसाखळी मध्ये अतिशय महत्वाची भूमिका अद्भुत अश्या तिवरांच्या जंगलाची आहे. सागरी व खाडीतील जीवसृष्टी, किनारपट्टी भागातील लोकवस्तीची सुरक्षितता, मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या तिवरांच्या जंगलांचे संरक्षक कवच मीरा भाईंदर शहराला आहे. ते कायम टिकून रहायला हवे. तिवरांच्या संवर्धनाची गरज ही काळाची गरज आहे. त्यामुळे चौपाटी विकासा बरोबरच त्याच परिसरात हे 'मँग्रोज पार्क' तयार केले जाणार आहे, असे आ. सरनाईक म्हणाले.