लोकांनी दिलेले कपडे मीरा-भाईंदर महापालिकेने गरजूंना मोफत वाटले
By धीरज परब | Published: July 24, 2023 02:03 PM2023-07-24T14:03:04+5:302023-07-24T14:03:22+5:30
महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी गोळा झालेले कपडे हे स्वच्छ करून झोपडपट्टी भागात गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता .
मीरारोड - आरआरआर केंद्रात शहरातील नागरिकांनी दिलेले कपडे हे महापालिकेने भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टी मध्ये त्या कपड्यांचे प्रदर्शन मांडून गरजूना विनामूल्य दिले .
मीरा भाईंदर महापालिकेने शासनाच्या मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर अभियान उपक्रम नुसार शहरात २४ रिड्यूस, रियुज आणि रिसायकल अर्थात आरआरआर केंद्र २० मे ते ५ जून पर्यंत उघडली होती . त्या केंद्रां मध्ये नागरिकांनी सर्वात जास्त जुने कपडे हे आरआरआर केंद्रात आणून दिले होते . सुमारे ४ हजार किलो वजनाचे जुने कपडे गोळा झाले होते.
महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी गोळा झालेले कपडे हे स्वच्छ करून झोपडपट्टी भागात गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता . त्या अनुषंगाने रविवार २३ जुलै रोजी भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगर भागात महापालिकेने कपड्यांचे प्रदर्शन भरवत गरजू लोकांना जे कपडे हवे असतील ते मोफत उपलब्ध केले होते. आयुक्त ढोले यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या ह्या प्रदर्शनात झोपडपट्टीतील अनेक मुलं व मोठ्यांनी जाऊन आपल्या हवे त्या आकाराचे व रंगाचे कपडे घेतले . चांगले कपडे मोफत मिळाल्याने त्यांना सुद्धा आनंद झाला .
यावेळी महापालिकेने ऑपरेश रुद्र अंतर्गत गणेशदेवल नगर , बजरंग नगर ह्या झोपडपट्टीतील रहिवाश्याना स्वच्छतेबाबत जनजागृती करत आपला परिसर कसा स्वच्छ ठेवावा, कचरा कुंडीचा वापर करावा , ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा आदी बाबत जनजागृती केली . यावेळी महापालिका अधिकारी , स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी, मेकिंग द डिफरन्स या संस्थेचे प्रतिनिधी आदींनी मिळून जनजागृतीपर रॅली काढली .