सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका देणार विनाशुल्क परवाना, आयुक्तांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 09:18 PM2022-07-22T21:18:14+5:302022-07-22T21:19:24+5:30

Thane : शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दहीहंडी, गणेशोत्सव व मोहरम आदी उत्सव काळात करावयाच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

The commissioner reviewed the free license to be given by the thane municipality to the public Ganeshotsav mandals | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका देणार विनाशुल्क परवाना, आयुक्तांनी घेतला आढावा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका देणार विनाशुल्क परवाना, आयुक्तांनी घेतला आढावा

googlenewsNext

ठाणे : यंदाचा गणेशोत्सव आणि दहीहंडीचा सण निर्बंधांविना साजरा करण्यात येणार असून ठाणे महापालिकेच्यावतीने गणेश मंडळांना उत्सवासाठी विनाशुल्क परवानगी मिळणार आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दहीहंडी, गणेशोत्सव व मोहरम आदी उत्सव काळात करावयाच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेतला. उत्सवासाठी आवश्यक त्या सोयी-व्यवस्था वेळेत करण्यासाठी लगेचच कामाला लागण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या.

महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. या बैठकीमधे त्यांनी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी उत्सव मंडळ व मोहरम उत्सवासाठी आवश्यक परवानग्या विनाशुल्क देण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच विसर्जन घाटांवर तराफा व क्रेनची व्यवस्था करणे, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मूर्ती विसर्जन ठिकाणी विद्युत व्यवस्था करणे, विसर्जन मार्गावरील झाडांच्या फाद्यांची छाटणी करणे  तसेच विसर्जन घाटांवर आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

कोलशेत विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर, कोपरी, उपवन तलाव, रायलादेवी व मासुंदा तलाव या प्रमुख विसर्जन व्यवस्थेची पाहणी प्रभाग समिती निहाय इतर संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना  सर्व सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता यांना दिल्या.  तसेच इतर सरकारी यंत्रणांशी सकारात्मक समन्वय साधून उत्सवांचे नियोजन करण्याचे निर्देशही विभागप्रमुखांना त्यांनी दिले. 

दरवर्षीप्रमाणे श्री गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने विसर्जन महाघाट, कृत्रीम तलाव तर ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे, फिरते विसर्जन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याच बैठकीत कोरोना संसर्गाचा आढावा ही घेण्यात आला. तसेच सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी बुस्टर डोस लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचबरोबर प्रत्येक मूर्ती विसर्जन ठिकाणी महापालिकेच्यावतीने वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आहे. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी, अँटीजेन टेस्ट तसेच बुस्टर डोसची सोय करण्यात येणार आहे.

Web Title: The commissioner reviewed the free license to be given by the thane municipality to the public Ganeshotsav mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.