उल्हासनगर महापालिका शौचालय पाडून करण्यात आलेले बांधकाम निष्काशीत, महापालिकेचे लागले नामफलक
By सदानंद नाईक | Published: March 8, 2023 06:26 PM2023-03-08T18:26:50+5:302023-03-08T18:28:06+5:30
उल्हासनगर महापालिका मालमत्ता भूमाफियांच्या टार्गेटवर असून महापालिका शौचालय, समाजमंदिर, शाळा, उद्यान आदिवर त्यांनी अतिक्रमण केल्याचे प्रकार उघड झाले.
उल्हासनगर : कॅम्प नं-२ येथील सोनार गल्लीतील महापालिका शौचालय पाडून त्याजागी बांधण्यात आलेले अवैध बांधकाम निष्काशीत करण्यात आले. त्याजागी महापालिका नामफलक लावले असून शौचालय जागी बांधकाम करणाऱ्याला पाठीशी न घालता कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता भूमाफियांच्या टार्गेटवर असून महापालिका शौचालय, समाजमंदिर, शाळा, उद्यान आदिवर त्यांनी अतिक्रमण केल्याचे प्रकार उघड झाले. शनिवारी, रविवार व होळीची सुट्टी सलग आल्याचा फायदा भूमाफियाने उठवून कॅम्प नं-२ सोनार गल्लीतील जुने महापालिका शौचालय पाडून त्याजागी नवीन बांधकाम सुरू केले. मात्र जागृत नागरिकांनी महापालिका शौचालयावर अतिक्रमण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्यावर, कारवाईची मागणी नागरिकांकडून झाली. काही सामाजिक संस्थांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे तक्रार केल्यावर, लेंगरेकर यांनी महापालिका कर्मचारी पाठवून बांधकामावर कारवाई केली. तसेच अर्धवट पाडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी महापालिका शौचालय असे नामफलक लावून नवीन शौचालय बांधण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले.
महापालिका शौचालय पाडून त्याजागी सर्रासपणे कोणाची भीती न बाळगता अवैध बांधकाम करणाऱ्या भूमाफियावर कारवाई का नाही?. महापालिका त्याला पाठीशी घालते का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियावर केली जात आहे. महापालिका शाळेच्या मैदानावर खाजगी संस्थेला सनद दिल्याचा प्रकार नुकताच घडला असून मैदानाची किंमत १० ते १५ कोट्यवधींच्या घरात आहे. याप्रकारने प्रांत कार्यालय, भु-मापन कार्यालय, महापालिका नगररचनाकार विभाग वादात सापडले आहे. तसेच सोनार गल्लीतील इतर महापालिका शौचालय कुठे हरविले? असाही प्रश्न उपस्थित झाला असून महापालिका अधिकारी व स्थानिक नगरसेवक वादीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.