नसबंदी करायला धाडस लागते मर्दा; पुरुषांचे प्रमाण कमी, वर्षभरात महिलाच आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:08 AM2022-03-25T11:08:54+5:302022-03-25T11:09:02+5:30
- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (नसबंदी) करण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या तीन वर्षांच्या ...
- सुरेश लोखंडे
ठाणे : कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (नसबंदी) करण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या शस्त्रक्रिया कमालीच्या कमी झाल्या आहेत. त्यातही पुरुषांची संख्या अत्यंत कमी म्हणजे नाहीच्या बरोबरीत आहे. कदाचित यास पुरुष प्रधान संस्कृती कारणीभूत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे या शस्त्रक्रियांमध्ये वर्षभरात महिलाच आघाडीवर दिसून आल्या आहेत.
कोरोना महामारीच्या कारणामुळे या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत फारच कमी आहे. यातही महिलांच्या शस्त्रक्रिया सर्वाधिक झालेल्या आहेत. पुरुषांकडून स्वत: मात्र या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला जात नसल्याचे वास्तव जिल्ह्यातही दिसून आले आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पुरुषांना या शस्त्रक्रियेसाठी तयार करण्याची गरज आहे. कुटुंब नियोजनाची मक्तेदारी जणू महिलांनीच घेतलेली दिसून येत आहे. कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांकडून महिलांना शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जात आहे. तर महिलाही स्वत:हून शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालय गाठत असल्याचे वास्तव बहुतांशी रुग्णालयात आढळले आहे.
या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांचे प्रमाण मात्र फारच कमी दिसून येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कुटुंब नियोजनची जनजागृती झाली. मात्र, त्यातून कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीने शस्त्रक्रिया करण्याचा दृष्टिकोन बहुतांशी कुटुंबांमध्ये पाळला जात आहे. त्यातही पुरुषांना जड व अवघड कामे करावी लागत असल्याचे कारण पुढे करून घरातील ज्येष्ठ मंडळी महिलांच्या शस्त्रक्रियेला पसंती देत असल्यामुळे महिलांच्या शस्त्रक्रिया अधिक झाल्याचे वास्तवही ऐकायला मिळत आहे.
वर्षभरात एकूण - १८५४ शस्त्रक्रिया
महिलांचे प्रमाण-९९ टक्के
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे जिल्ह्यातील प्रमाण विचारात घेता जिल्ह्यात तब्बल ९९ टक्के महिलांनी शस्त्रक्रिया केल्याचे निदर्शनात आले आहे. नोव्हेंबरअखेर १ हजार ८५३ महिलांनी शस्त्रक्रिया केल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
पुरुष केवळ १ टक्का
महिलांच्या तुलनेत जिल्ह्यात अवघ्या एका पुरुषाने शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले आहे. केवळ एक टक्का पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. या प्रमाणात वाढ होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.