स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत देश स्वयंपूर्ण असेल - डाॅ. माेहन भागवत
By जितेंद्र कालेकर | Published: July 30, 2023 10:02 PM2023-07-30T22:02:45+5:302023-07-30T22:18:34+5:30
ठाण्यातील बाळकुम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमीपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ठाणे: वाईटाच्या तुलनेत देशात ४० टक्के अधिक चांगली कामेही होत आहेत. पण कान डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे. तसेच अन्न, वस्त्र निवार्यापेक्षाही आरोग्य आणि शिक्षण महत्वाचे झाले असून या दोन्ही गोष्टी आपल्या देशात अपूर्ण असल्याची खंतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केली. आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. शतकपूर्ती होईल त्यावेळी देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाणे महापालिका, जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील बाळकुम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमीपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आज समाजात चांगले काम करणा-या व्यक्तीही आहेत. त्यातीलच एक चांगले काम म्हणजे ठाण्यात उभे राहत असलेले हे कॅन्सर रुग्णालय आहे. डॉ. भागवत पुढे म्हणाले, पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा या लोकांच्या मूलभूत गरजा होत्या. आता शिक्षण आ िण आरोग्य सेवा सर्वांनाच महत्वाची वाटते. या दोन्हीची व्यवस्था देशात अपुरी आहे. त्यातही रुग्णालयीन उपचाराचा सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचा आहे.
अल्पदरात उपचार मिळावेत, ही जनतेची गरज आहे. नागरिकांना कॅन्सरसारख्या आजारावर स्वस्तात जवळ उपचार मिळण्याची अपेक्षा आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरच्या रुग्णांची संख्याही वाढल्याचे ते म्हणाले. चांगल्या कार्यातून चांगले घडेल, याच आशेतून कोणतेही कार्य करण्याची गरज आहे. कोणतीही प्रेरणा ही संवेदनेतून निर्माण होते. संवेदनेतूनच कोणीही दुसऱ्याच्या भल्यासाठी पुढाकार घेतो. जीव सेवा हीच शिव सेवा आहे. आपल्या देशातील सगळ्या बाबी अध्यात्मिक दुर्बीणीतून बघितली जाते. पवित्रताही पाहिली जाते. कॅन्सर रुग्णालय उभे राहणे म्हणजे शिव कार्य होत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. शासन आणि समाज दोघेही संवेदनशील आहे त्यामुळे चांगले कार्य होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात जगाच्या तुलनेत भारतात भयावह परिस्थिती नव्हती. डॉक्टरांसह सर्वांनी मिळून कोरोनाच्या राक्षसाचा सामूहिक मुकाबला केल्याचे गौरवोद्गारही भागवत यांनी काढले .
संपूर्ण राज्यासाठी उपयोगी ठरणार- मुख्यमंत्री शिंदे
ठाणे जिल्हाच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने हे कॅन्सर रुग्णालय उपयोगाचे ठरणार आहे. दवा बरोबर दुव्याचीही गरज असल्यामुळेच याठिकाणी रुग्णालयाबरोबर त्रिमंदिर संकुलही उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या रुग्णालयाच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी दुसऱ्यांचे दु:ख कमी करण्याचे काम केले.लोकांना आनंद कसा मिळेल यासाठीच आयुष्यभर प्रयत्न केला. अशा आनंद दिघे यांच्या नावाने रुग्णालय उभे राहत असल्याचा आपल्याला आनंद आहे. रुग्णसेवेला आनंद दिघे यांनी नेहमीच प्राधान्य दिले .
कॅन्सर रुग्णालय हे आनंद दिघे यांचे जिवंत स्मारक ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माझी आई कॅन्सरनेच गेली. देवेंद्र फडणवीस यांचे वडिलही याच आजाराने ग्रस्त होते. कॅन्सर कोणालाच होऊ नये, अशी भावना असते. समाजाचे दु:ख आपले मानणारे आम्ही आहोत. असे एकनाथ शिंदे म्हणाले. आनंद दिघे यांनी अनेकांचे उध्वस्त होणारे आयुष्य वाचवण्याचे काम केले. माझे उध्वस्त झालेले कुटुंब ही आनंद दिघे यांनीच सावरले.अशी आठवणही मुख्यमंत्र्यानी सांगितली. त्यांच्या नावाने उभे राहणारे हे रुग्णालय लोकांना जिद्दीने उभे
राहण्यासाठी स्फूर्ती देईल, असेही ते म्हणाले.
देशाचा जीडीपी वाढविण्यात जैन समाजाचा वाटा- देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, आनंद दिघे यांचे कार्य खूप मोठे आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या अत्यंत दुर्गम भागात काम करायचे.तेव्हा त्यांच्या रुग्णवाहिकामुळे अनेकांचे प्राण वाचले. दुर्गम भागात सेवा करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांची परंपरा एकनाथ शिंदे चालवत आहे. तसेच ज्यांच्या पाठी जैन समाज आणि जितो असतात, त्यांना संसाधानाची कोणतीही कमी नसते. असे ही फडणवीस म्हणाले . आज देशाचा जीडीपी वाढवण्यात जैन समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजातील व्यक्ती नुसते पैसे कमवत नाही . तर लोकांची सेवा पण करतात. या रुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण येथून बरा होऊनच जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी गुजरातच्या अडलजच्या दादा भगवान फाऊंडेशनचे दीपक देसाई यांनीही मार्गदर्शन केले.