जन्मत: अंधत्वाचा ‘शाप’; आईचे निधन, तरी मिळवले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 10:02 AM2023-05-26T10:02:08+5:302023-05-26T10:02:30+5:30
सोहनकुमार भट्ट याचे संघर्षमय जीवन : आईच्या उपचाराकरिता वडिलांनी विकली रिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोहनकुमार भट्ट याला जन्मत: १०० टक्के अंधत्वाचा ‘शाप’ मिळाला होता. तरीही त्याच्यात शिकण्याची जिद्द आहे. बारावीचा अभ्यास सुरू असताना या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षातच आईचे आजाराने निधन झाले. वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना रिक्षा विकावी लागली. संसाराचा गाडा हाकण्यासाठी भाऊ नोकरी करू लागला, तर वडिलांनी घर सांभाळण्यास सुरुवात केली. दु:खाचा डोंगर समोर असताना, कलेक्टर होण्याचे स्वप्न सोहनकुमारच्या डोळ्यात आहे. ही जिद्द मनात ठेवली अन् आईच्या आठवणी उराशी बाळगून अंधत्व आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सोहनकुमारने ८०.८३ टक्के मिळवून यशाचा सोपान गाठला.
सोहनकुमार हा जोशी बेडेकर महाविद्यालयात शिकत आहे. पहिली ते नववी त्याने बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयात शिक्षण घेतले. त्यावेळी तो ब्रेल लिपीतून शिकत होता. दहावीच्या परीक्षेच्या वेळी लॉकडाऊन लागला. कोरोनामुळे परीक्षा झाली नाही तरीही त्याने ६३.२० टक्के गुण मिळविले. हॉस्टेलमध्ये आयुष्य गेल्याने अंधत्वामुळे बाहेर पडण्याची भीती होती. पडलो, धडपडलो, काही लागले तर असे विचार सतत मनात येत होते. त्यामुळे सोहनकुमारचा आत्मविश्वास कमी होत होता. अकरावीला त्याने कला शाखेत प्रवेश घेतला. अकरावीचा पेपर सोडविण्यासाठी त्याने स्वत: रायटर शोधला.
बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सोहनकुमारच्या आईला गंभीर आजारपणाने गाठले. आईचे आजारपण दुसरीकडे बारावीचे महत्त्वाचे वर्ष अशी परिस्थिती सोहनकुमार समोर उभी होती. आईच्या आजारपणासाठी त्याचे वडील रामाशिष कुमार यांना रिक्षा विकावी लागली. भाऊ खासगी कंपनीत नोकरीला लागला आणि आईच्या निधनानंतर वडील पूर्ण घर सांभाळत आहेत. सोहनकुमारच्या घरी केवळ त्याचा भाऊच कमावता आहे. आईचे निधन झाल्यानंतर तिच्या आठवणीमुळे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. परंतु भाऊ, वडिलांनी साथ दिली. मराठी माध्यमात शिकल्याने महाविद्यालयात इंग्रजीत शिकविले जात असल्यामुळे काही गोष्टी कळत नव्हत्या. मराठीत शिकवणी लावल्याचे सोहनकुमारने सांगितले. बारावीसाठी महाविद्यालयाने सोहनकुमारला रायटर पुरवला होता.
यूपीएससी देऊन कलेक्टर होण्याचे स्वप्न
बारावीनंतर कला शाखेतून पदवी घेणार आहे. यूपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होण्याचे स्वप्न आहे. या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी आतापासूनच सुरू करणार आहे, असे सोहनकुमारने सांगितले.
सुरुवातीला वडील महाविद्यालयात सोडायला येत. नंतर त्याने तू एकटा जा असे सांगितले. मी एकटा भीत भीत जाऊ लागलो. पण मागून वडील येत असत. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर पाठीमागे वडील असल्याचे समजत असे, असे सोहनकुमार म्हणाला.