ठाण्यातील कळवा खाडी पुलाच्या कामाची मुदत पुढे सरकली, पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना

By जितेंद्र कालेकर | Published: September 12, 2022 07:02 PM2022-09-12T19:02:45+5:302022-09-12T19:03:07+5:30

ठाण्यातील कळवा खाडी पुलाच्या कामाची मुदत पुढे सरकली आहे. 

The deadline for the work of Kalwa Khadi bridge in Thane has been pushed forward. | ठाण्यातील कळवा खाडी पुलाच्या कामाची मुदत पुढे सरकली, पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना

ठाण्यातील कळवा खाडी पुलाच्या कामाची मुदत पुढे सरकली, पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना

googlenewsNext

ठाणे: नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कळवा खाडीवर उभारलेल्या नवीन पुलावरील एका मार्गिकेचे काम ऑगस्ट महिनाअखेर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने ठेकेदाराला दिले. चारवेळा मुदतवाढ दिलेल्या कळवा पुलाच्या कामाची ऑगस्ट महिनाअखेर पर्यंतची मुदत हुकली. हा पूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला होऊ न शकल्यामुळे नागरिकांना अद्यापही कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, काही किरकोळ कामे येत्या काही दिवसात पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. यामुळे नवरात्रौत्सवाच्या काळात हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी दोन खाडी पूल आहेत. त्यापैकी ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद केला आहे. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पूल उभारण्यात येत आहे. जून २०२२ पर्यंत पुलाच्या कामाची मुदत संपली तरी त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना एक पत्र देऊन हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. ठाणे महापालिकेने या पुलाचे काम महिनाभरात उरकून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू केली होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या पुलाच्या कामाचा पाहणी दौरा करत या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागासह ठेकेदाराला दिले होते. परंतु या मुदतीतही पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

काय कामे शिल्लक
कळवा तिसरा खाडी पुलाचे बांधकाम एकूण २.४० किमी असणार आहे. १८१ कोटी १९ लाख रुपये खर्च करून हा पूल तयार करण्यात येत आहे. या खाडी पुलाची लांबी ३०० मीटरची आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका आहे. विद्युतीकरण आणि सुशोभिकरण अशी कामे सुरू आहेत. उर्वरित मार्गिकांवरील पुलाच्या जोडणीची कामे अंतिम टप्प्यात असून या कामांबरोबरच इतर कामे पूर्ण करून या मार्गिका डिसेंबर अखेरपर्यंत खुली करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी मार्गिका रंगरंगोटी अशी किरकोळ कामे सुरू आहेत. त्याचबरोबर कारागृहाच्या आतील बाजूचे चित्र दिसू नये म्हणून कारागृहाबाजूकडील पुलाजवळ भिंती उभारणीचे काम सुरू आहे. ही कामे लवकरच पूर्ण होतील आणि त्यानंतर ही मार्गिका सुरू करण्यात येईल, अशी माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. 


 

Web Title: The deadline for the work of Kalwa Khadi bridge in Thane has been pushed forward.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.