घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Published: June 12, 2024 05:59 PM2024-06-12T17:59:42+5:302024-06-12T18:00:34+5:30
घरात लागलेल्या आगीनंतर वडील, पत्नी आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा आग विझविण्यासाठी गेलेले अरुण केडिया (४७) हे बेशुद्धावस्थेतच घरात कोसळले.
ठाणे: घरात लागलेल्या आगीनंतर वडील, पत्नी आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा आग विझविण्यासाठी गेलेले अरुण केडिया (४७) हे बेशुद्धावस्थेतच घरात कोसळले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बेशुद्धावस्थेतच तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.
या घटनेत केडिया यांच्या कुटूंबातील चौघेजण बचावले असले तरी अरुण यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही घटना बुधवारी पहाटे ३ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास तुळशीधाम परिसरात समोर आली. आगीच्या घटनेत केडिया यांच्या घरातील साहित्य पूर्णत: जळाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.
तुळशीधाम भागातील तळ अधिक २७ मजली कृष्णा सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर नाथमल केडिया यांच्या मालकीच्या सदनिका क्रमांक ४०५ मध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली. आगीची ही माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यावेळी अरुण केडीया हे आग लागलेल्या खोलीमध्ये बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळले. त्यांना तातडीने बाहेर काढून बेथनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घरात अरुण यांच्यासह त्यांचे वडील,पत्नी आणि दोन मुले असे पाच जण वास्तव्याला होते. त्यांच्या घरात आग लागताच खबरदारीचा उपाय म्हणून अरुण यांनी रूममधील त्यांचे वडिल नाथमल केडिया (७१), पत्नी अनिशा (४३), मुलगी अनन्या (१७) आणि मुलगा अविनाश (१२) यांना सुखरूप घरातून बाहेर काढले. याचदरम्यान त्या इमारतीमधील सर्व रहिवासीही इमारतीच्या बाहेर सुखरूप आले होते. आग विझविताना अरुण हे बेशुद्ध झाले. ही आग पहाटे ४.१५ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी पूर्णपणे नियंत्रणात आणली. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, शॉर्टसर्किट किंवा एसीतील बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तविली आहे.