आव्हाडांना अटक करणाऱ्या उपायुक्तांची झाली बदली, डॉ. विनयकुमार राठोड यांना बक्षिसी मिळाल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:49 PM2022-11-13T12:49:13+5:302022-11-13T12:49:33+5:30
Police Transfer : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करून शुक्रवारची रात्र पोलिस कोठडीत ठेवण्याच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका असणारे झोन ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची शनिवारी अचानक वाहतूक शाखेत बदली करण्यात आली.
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करून शुक्रवारची रात्र पोलिस कोठडीत ठेवण्याच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका असणारे झोन ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची शनिवारी अचानक वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. वाहतूक विभागातील बदली ही राठोड यांना मिळालेली बक्षिसी असल्याचा आरोप खुद्द आव्हाड यांनी केला आहे, तर राठोड यांच्यासह दहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने ही नियमित बदली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आव्हाड यांना पोलिस ठाण्यात शुक्रवारी हजर राहण्यास सांगितल्यानंतर थोड्याच वेळात राठोड तेथे दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. आव्हाड यांना वैद्यकीय तपासणीस नेताना पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. ही सर्व परिस्थिती राठोड यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी शुक्रवारी हाताळली. शुक्रवारी जामीन मिळू नये याकरिता पोलिसांवर दबाव असल्याचे आव्हाड यांचे म्हणणे होते. आव्हाड यांना शनिवारी जामीन मंजूर होताच राठोड यांची वाहतूक विभागाच्या दीर्घकाळ रिक्त असलेल्या उपायुक्तपदावर बदली झाल्याचे वृत्त आले.
दहा उपायुक्तांच्या बदल्या
ही नियमित बदली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. राठोड यांना झोन ५ मध्ये दोन वर्षे पूर्ण झाली होती. तसेच वाहतूक विभागाचे उपायुक्तपद मागील सहा महिने रिक्त होते. त्यामुळे त्या जागी त्यांची बदली करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक विभाग हा पोलिस आयुक्तालयाचा भाग असल्यामुळे राठोड यांना बक्षिसी मिळाल्याची चर्चा सुरू आहे. राठोड यांच्यासोबत दहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.