धनगर समाजाने दिला मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 29, 2023 06:09 PM2023-10-29T18:09:05+5:302023-10-29T18:09:19+5:30
रविवारी या साखळी उपोषणाला ठाण्यातील सकल धनगर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
ठाणे : मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने ३० दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारने ४२ दिवस उलटले तरी आरक्षण दिले नाही. त्यामुळे जालना येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात २८ ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी या साखळी उपोषणाला ठाण्यातील सकल धनगर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले आणि संपूर्ण विश्वात शांततेने आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला.तरी देखील सरकारने टिकणारे आरक्षण दिले नाही.असाचा प्रकार धनगर समाजाबाबत सरकारने केले.धनगर समाज गेले ६५ वर्ष धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी व्हावी म्हणून मोर्चे, आंदोलन करत आहेत परंतू आजपर्यंत सरकारने आरक्षण लागू केलेले नाही. त्यामुळे धनगर व मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी ठाण्यात धनगर समाजाने मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
सरकारने ५० दिवसांचा अवधी धनगर समाजाकडून मागितला होता परंतू सरकारने काहीही केलेले नाही म्हणून नोव्हेंबर महिन्यात धनगर समाजाच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.असे समाजाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे नेते शंकर वीरकर, समाजाचे नेते शंकर कोळेकर, दीपक कुरकुंडे,अभिजित कोकरे व इतर उपस्थित होते.