दिशा बदलली, आता तरी अंबरनाथमधील पं. नेहरूंच्या पुतळ्याचे अनावरण होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:39 AM2023-12-06T09:39:50+5:302023-12-06T09:40:04+5:30
अंबरनाथमध्ये ४५ वर्षांपासून पुतळ्याची उपेक्षा
पंकज पाटील
अंबरनाथ : औद्योगिकीकरणाचा वारसा लाभलेल्या अंबरनाथ नगरपालिका हद्दीत १९७२ मध्ये उभारलेला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा गेली ४५ वर्षे अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनामुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नाही. त्यानंतर प्रशासकीय राजवट आली. आता चौथरा नादुरुस्त झाल्याने पुतळ्याची दिशा बदलून प्रवेशद्वाराकडे तोंड केले जाणार आहे. त्यानंतर तरी पुतळ्याची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा आहे.
स्वतंत्र भारताची पायाभरणी करणारे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला. त्यानुसार १९७२ मध्ये कामाला सुरुवात झाली. काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांच्या कार्यकाळात पुतळा उभारण्यात येणार होता. अंबरनाथ रेल्वेस्थानकाला लागूनच उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे तेव्हा एका भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पालिका बरखास्त केली होती.
अंबरनाथ पालिका बरखास्त झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा समावेश कल्याण- डोंबिवली महापालिकेत करण्यात आला; परंतु कल्याण- डोंबिवली महापालिकेनेदेखील पुतळ्याकडे दुर्लक्ष केले. कल्याण- डोंबिवली महापालिकेतून बाहेर पडून पुन्हा एकदा १९९२ मध्ये नगरपालिकेची पुनर्स्थापना करण्यात आली. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपची नगरपालिकेत सत्ता आली. या सत्ता स्थापनेपासून आजपर्यंत सत्ताधारी शिवसेना- भाजपने पुतळ्याकडे दुर्लक्षच केले.
पं. जवाहरलाल नेहरूंचे उद्यानालाही नाव
१९७२ मध्ये पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील शिल्पकार हरीश तालीम यांनी हा पुतळा तयार केला होता.
१९७८ मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर या पुतळ्याचे अनावरण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुतळ्याचे अनावरण झाले नाही.
पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला, त्या उद्यानालाही पंडित जवाहरलाल नेहरू यांचेच नाव देण्यात आले. उद्यानाला नाव दिले असले तरी पुतळ्याचे अनावरण झालेले नाही.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, पुन्हा एकदा हा पुतळा चर्चेत आला आहे.
पुतळ्याचा चौथरा कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती करून हा पुतळा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभा केला जाणार आहे.