दोन जेवणातील अंतर किती हवे; झोप किती तास हवी?, जाणून घ्या, डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:48 AM2022-03-21T10:48:58+5:302022-03-21T10:49:07+5:30
ठाणे : बैठे काम करणाऱ्यांनी २५ ते ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. जेवढे जास्त बसाल ...
ठाणे : बैठे काम करणाऱ्यांनी २५ ते ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. जेवढे जास्त बसाल तेवढे आजार वाढतात. तसेच वजन वाढीवरदेखील परिणाम होतो. त्यामुळे योग्य व्यायाम आणि त्याला संतुलित आहाराची जोड देण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. हल्ली संगणकासमोर तासन्तास बसून काम करावे लागते. वर्क फ्रॉम होममुळे तर कामांचे तास वाढले असल्याने अनेकांना मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी सारख्या आजारांना सामोरे जावे लागले. शारीरिक हालचाली नसल्याने आजारांना आयते आमंत्रण मिळते. तसेच वजनावर देखील नियंत्रण नसल्याने ते वाढत जाते. त्यामुळे बैठे काम असेल तर अधूनमधून उठून किमान उभे राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
१. पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून नकोच
-२५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका जागी बसू नये, शारीरिक हालचाली नसल्याने वजन पण वाढते. तसेच एकाच जागी बसून राहिल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती देखील असते. - प्रिया गुरव, आहारतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल
२. दोन जेवणातील अंतर किती हवे?
दोन जेवणातील अंतर हे सात ते आठ तासांचे असावे. मधल्या वेळेत जंक फूड खाणे टाळावे. दर दोन तासांनी खाणे ज्यांना शक्य नाही त्यांनी सायं.काळी ६.३० वा. फळे, मखाना, कुरमुरे, शेंगदाण्याची चिक्की असे पदार्थ खाण्यांवर भर द्यावा.
३. सकाळी उठल्या उठल्या चहापेक्षा ताजी फळे खा
सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची अनेकांना सवय असते; परंतु सकाळी उठल्यावर चहापेक्षा संपूर्ण अख्खे फळ खावे कारण पूर्ण फळ चावून खाल्ल्याने त्यातील पोषणतत्त्वे तर मिळतात शिवाय दातांचा व्यायामदेखील होतो; परंतु फळांचा रस टाळावा. - प्रिया गुरव, आहारतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल
४. झोप किती तास हवी ?
स्मार्टफोनमुळे हल्ली उशिरा झोपण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु कमीत कमी आठ तास झोप शरीराला आवश्यक आहे. रात्री किमान १० ते ११ मध्ये झोपणे आवश्यक आहे.
५. किमान अर्धा तास व्यायाम-प्राणायाम हवाच
ज्या लोकांना व्यायामासाठी दिवसभर वेळ मिळत नाही त्यांनी वेळ मिळेल तेव्हा योगा करावा. योगामुळे शरीराला आतून फायदा होतोच. तसेच प्राणायामदेखील महत्त्वाचा आहे. शरीरातील ताणतणाव, कफचा आजार कमी करतो आणि एकाग्रता वाढीस मदत होते.
- विनोद पोळ, व्यायाम प्रशिक्षक