ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
By सुरेश लोखंडे | Published: July 30, 2023 02:40 PM2023-07-30T14:40:35+5:302023-07-30T14:40:51+5:30
महसूल प्रशासनाची व विविध सेवांची माहिती व्हावी, जनतेला त्याचा लाभ मिळावा, यासाठी महसूल सप्ताह उपक्रम लाभदायी ठरणार आहे
ठाणे : जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील जनतेला महसूल विभागातील महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग यांची सर्वंकष माहिती व्हावी, त्यांच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद आणि उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करून हा उपक्रम यशस्वी करावा, असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.
महसूल प्रशासनाची व विविध सेवांची माहिती व्हावी, जनतेला त्याचा लाभ मिळावा, यासाठी महसूल सप्ताह उपक्रम लाभदायी ठरणार आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जनतेला सहभागी करून घ्यावे, असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या वतीने प्रथमच 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.
महसूल सप्ताहाचे कार्यक्रम
महसूल सप्ताहानिमित्त सात दिवस विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये १ ऑगस्ट रोजी महसूल दिन व महसूल सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. तर २ ऑगस्ट रोजी माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमधील तरुणांना महसूल संबंधीच्या सेवांविषयी माहिती देणारा युवा संवादचा मुख्य कार्यक्रम भिवंडीत होईल. सर्व तालुक्यातही याचे आयोजन होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत शहापूर येथे जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम होणार असून प्रत्येक तालुक्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध दाखले देणे, आपदग्रस्तांना मदत देणे आदींसाठी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमात मंडळनिहाय महसूल अदालतीचे आयोजन होणार आहे.
मुरबाडमध्ये जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध स्तरावर प्रलंबित प्रकरणे/अर्ज निकाली काढण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी माजी सैनिकांसाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम होणार असून कल्याणमध्ये त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहाची सांगता ७ ऑगस्ट रोजी भिवंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.