दीड किलोच्या बाळाला डॉक्टरांनी केले फीडिंग; सतत रडणारे बाळ झाले एकदम शांत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:29 AM2023-12-18T09:29:37+5:302023-12-18T09:29:45+5:30
१२ डिसेंबर रोजी पहाटे दाेन वाजता महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ दीड किलोचे असल्याने त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवले आहे. मात्र, त्याची आई त्याला फीडिंग करू शकत नसल्याने ही चिंतेची बाब झाली होती.
- सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : येथील मध्यवर्ती रुग्णालयात एका मनोरुग्ण महिलेने नुकतेच दीड किलोच्या बाळाला जन्म दिला. त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, आई मनोरुग्ण असल्याने ती बाळाला फीडिंग (स्तनपान) करू शकत नव्हती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने अन्य डॉक्टरांच्या मदतीने त्याला फीडिंग केले. त्यानंतर सतत रडणारे बाळ शांत झाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता, रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळून ते बरे व्हावे, अशी आमची भूमिका असते. यातूनच बाळाला डॉक्टरांनी फीडिंग केल्याचे त्यांनी सांगितले.
१२ डिसेंबर रोजी पहाटे दाेन वाजता महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ दीड किलोचे असल्याने त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवले आहे. मात्र, त्याची आई त्याला फीडिंग करू शकत नसल्याने ही चिंतेची बाब झाली होती.
या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे व अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयू कक्षात बाळाला अन्य डॉक्टरांच्या मदतीने फीडिंग करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण यांनी पुढाकार घेऊन बालकास फीडिंग केले. त्यानंतर रडणारे बाळ शांत होऊन मायेची ऊब मिळाली. डॉक्टरांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.