उल्हासनगरातील ७२० जणांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; पंतप्रधान 'आवास'चा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 04:26 PM2022-04-15T16:26:18+5:302022-04-15T16:30:01+5:30
सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं. ४ संतोषनगरमधील तब्बल ७२० नागरिकांचे घराचे स्वप्न पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पूर्ण होणार आहे. ...
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं. ४ संतोषनगरमधील तब्बल ७२० नागरिकांचे घराचे स्वप्न पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पूर्ण होणार आहे. प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी संतोषनगर झोपडपट्टीच्या जागेला बुधवारी मालकी हक्क (सनद) दिल्याने योजना कार्यान्वित होण्याचे संकेत महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.
उल्हासनगरातील जागांवर राज्य शासनाचा मालकी हक्क आहे. त्यामुळे कोणत्याही जागेचा विकास करताना जागेची मालकी हक्क (सनद) घ्यावी लागते. महापालिकेने एकूण एक हजार ६५ मालमत्तांना सनद मिळण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे सविस्तर प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला. त्यानंतर महापालिका मुख्यालय, व्हीटीसी मैदान, इंदिरा गांधी मार्केट, महापालिका शाळा, आयडीआय कंपनी जवळील कब्रस्तान, गोल मैदान, हिरा घाट अशा १५ पेक्षा जास्त मालमत्तांना सनद मिळाली.
पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी कॅम्प नं. ४ येथील संतोषनगर झोपडपट्टीची निवड करून, त्यातील एकूण ७२० नागरिकांना नवीन घरे देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला. मात्र, या झोपडपट्टीच्या जागेला सनद नसल्याने, ती मिळविण्यासाठी नाईकवाडे यांनी त्या जागेचा प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पाठविला. प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी या जागेला बुधवारी सनद दिली. त्यामुळे तेथे आता पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित होण्यास हिरवा कंदील मिळाल्याचे नाईकवाडे म्हणाले.
कारभारी यांनी सनदची फाईल धूळ खात न पडू देता संतोषनगर येथील जागेला तसेच कॅम्प नं. ५ येथील हिंदू स्मशानभूमीच्या शेजारील जागेला कब्रस्तानसाठी सनद दिली. यामुळे मुस्लिम समाजाने समाधान व्यक्त केले. दरम्यान, स्थानिक माजी नगरसेवक धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, वसुधा बोडारे, शिवसेना नेते चंद्रकांत बोडारे यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना कार्यान्वित होऊन ७२० नागरिकांना बहुमजली इमारतीमध्ये घर मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
कारभारी यांचे कौतुक
प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी संतोषनगर झोपडपट्टीची मोजणी करून घराची यादी बनविली. गोरगरीब व गरजू शेकडो नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत स्वप्नातील घरे मिळण्यासाठी झोपडपट्टीच्या जागेला मालकी हक्क दिला. यामुळे कारभारी यांचे कौतुक होत आहे.