उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य
By सदानंद नाईक | Published: November 25, 2022 04:58 PM2022-11-25T16:58:26+5:302022-11-25T16:58:44+5:30
उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली असून सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
उल्हासनगर : शहरातील डम्पिंग ग्राऊंडला गुरवारी रात्री आग लागून परिसरात धुराचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले. शिवसेना ठाकरे गटाने डम्पिंग बंद करण्याची मागणी आयुक्ताकडे केली असून डम्पिंगवरील आग बुजविण्यासाठी मिस्ट मशीनचा उपयोग करण्यात आली. उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याने, कचऱ्याचे सपाटीकरण करून कचरा टाकला जातो. गुरवारी रात्री डम्पिंग वरील कचऱ्याला आग लागल्याने डम्पिंग परिसरात धुराचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यावर आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या रात्रभर आग विझवीत होत्या. सकाळी उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनिद केणी, एकनाथ पवार यांनी डम्पिंगची पाहणी करून धूळची मिस्ट मशीनद्वारे आग विझविण्यासाठी मागविली होती.
शहरातील डम्पिंगमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले. डम्पिंगला पर्याय म्हणून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला शेजारील उसाटने गाव येथे ३० एकरचा भूखंड हस्तांतर केला. मात्र स्थानिक गावकऱ्यांनी येथे डम्पिंग नको, अशी भूमिका घेऊन डम्पिंगला विरोध केला. हे प्रकरण सध्या न्यायालयात गेले. त्यानंतर बदलापूर येथे सामूहिक डम्पिंग ग्राऊंड मध्ये उल्हासनगरचा समावेश आहे. मात्र सामूहिक डम्पिंग सुरू होण्याला एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकीकडे डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून दुसरीकडे डम्पिंगसाठी पर्यायी जागा नाही. अश्या परिस्थितीत महापालिका सापडली आहे. डम्पिंगच्या आगीने परिसरात धुराचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास, त्वचा रोग, क्षयरोग, मळमळ येणे आदी रोगाचे लक्षणे जाणवत आहेत.
राणा खदान डम्पिंग सुरू करण्याची मागणी
कॅम्प नं-१ म्हारळगाव हद्दीतील जुनी राणा खदान डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर ७ कोटीच्या निधीतून प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे याडम्पिंगवर शहर पश्चिम मधील कचरा टाकण्याची मागणी होत आहे. डम्पिंगवरील खुल्या जागेवर सर्रासपणे अवैध चाळीचे बांधकाम सुरू असून यामध्ये स्थानिक राजकीय नेते, भूमाफिया, महापालिका अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे.