ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:38 AM2023-08-03T10:38:19+5:302023-08-03T10:38:19+5:30
गुन्हा दाखल; पण जबाबदारी केली नाही निश्चित...
भातसानगर : सोमवारी रात्री शहापूर तालुक्यातील (जि. ठाणे) सरलांबे गावाच्या हद्दीतील समृद्धी महामार्गाच्या गर्डर बसविण्याच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू होण्यास नवयुगा इंजिनीअरिंग व व्हीएसएल प्रा. लि. या ठेकेदार कंपन्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गुन्हा नोंदवून घेतला असला तरी अजून पोलिसांनी कुणा एका व्यक्तीवर जबाबदारी निश्चित केलेली नाही.
कामाच्या ठिकाणी बुधवारी सामसूम होती. अनेक कामगार भयभीत असून काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. महामार्गाच्या पिलरवर गर्डर लॉन्चिंग मशीनद्वारे आडवे गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना अपघात झाला होता. मशीनचे काम सुरू होण्यापूर्वी चाचणी केली होती का? संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सर्व कामगारांना सुरक्षा साधने दिली होती किंवा कसे, अशा विविध पैलूंची चौकशी पोलिस करणार आहेत. नवयुगा इंजिनीअरिंग कंपनी व व्ही.एस.एल. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निष्काळजीपणा केला असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या कोणत्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला, असे शहापूरचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पराड यांना विचारले असता त्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यापेक्षा अधिक बोलण्यास नकार दिला.
कामगारांवर दबाव
बुधवारी समृद्धीच्या येथील कामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांच्या बेस कॅम्पला भेट दिली असता दिवसपाळीने बरेच कामगार घरी गेले होते. काही कामगार घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्याशी संपर्क साधला मात्र अपघात, ठेकेदाराकडून घेतली जाणारी सुरक्षेची काळजी याबाबत कोणीही बोलण्यास तयार नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख आणि दबाव बरेच काही सांगून जात होता.
पाच पुलांचे ठेकेदाराला काम
नवयुगा कंपनीला शहापूर तालुक्यातील बिरवाडी ते आमने अशा ३७ किलोमीटरच्या अंतरामधील पाच ब्रिजचे काम दिले आहे. त्यापैकी सरलांबे, खुटगर, दोऱ्याचा पाडा, चिराडपाडा, आमणे येथे हे काम चालू आहे. सरलांबे येथील ब्रिजचे काम चालू असतानाच हा अपघात झाला. हे काम सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायचे होते. कंपनीने ब्रिजची कामे दोन वर्षांपूर्वी म्हणजे जून २०२० मध्ये सुरू केल्याचे कंपनीचे डीजीएम ईश्वर राव यांनी सांगितले.
सहा डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन
- शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या दुर्घटनेतील एकूण २० मृतांचे शवविच्छेदन करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या पथकाने अथक मेहनत घेतली.
- मंगळवारी पहाटे पाच वाजता सुरू झालेले शवविच्छेदनाचे काम सायंकाळी उशिरा सात वाजेपर्यंत सुरू होते. पोलिस पंचनामा व ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. वीस मृतांपैकी दोन मृतदेह विमानाने चेन्नई व बंगळुरूला नेण्यात आले.
- उर्वरित मृत कामगार बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राहुल जाधव, डॉ. गजेंद्र पवार, शिवकुमार, विक्रांत सिंग, विकास सिंग, डॉ. वंदना पाटील या सहा जणांच्या पथकाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शवविच्छेदन केले. अपघातात प्रचंड मार लागल्याने मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न होते, असे अधीक्षक जाधव यांनी सांगितले.