हिंदुत्वाचा तेजोमय वारसा; ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:10 AM2022-07-25T11:10:50+5:302022-07-25T11:12:01+5:30
विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा पहिला आणि एकमेव बॅनर आहे.
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत वेगळी भूमिका घेतल्यानंतर सर्वात आधी ठाण्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हादरा बसला. याठिकाणी बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. परंतु एकमेव ठाण्याचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. त्यात शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाण्यात शिवसेनेला खिंडार पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी एकवटले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आम्ही भाजपाशी युती केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्ववादी वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत आहेत. त्यात आता ठाण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा पहिला बॅनर झळकला आहे. या बॅनरची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. खासदार राजन विचारे यांनी हा बॅनर लावला आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा तेजोमय वारसा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
ठाण्यातील तलावपाळी परिसरातील जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा पहिला आणि एकमेव बॅनर आहे. ठाणे खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर हिंदुत्वाचा तेजोमय वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे, आदित्य ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.
खासदार श्रीकांत शिंदेंनी शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ
हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपसोबत आले आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सांगितले. महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू. मुख्यमंत्री शिंदेंच्या धाडसाचं कौतुक करत एकनाथ शिंदे हे मर्द मराठा आहेत, छत्रपतींचा मावळा अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. खासदार श्रीकांत शिंदेंनी फडणवीसांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा हे सरकार येईल, असं कुठेही ठरलं नव्हतं. त्यामुळे, एवढे लोकं, आमदार सोबत येतील हे त्यांनाही माहिती नव्हतं. कदाचित असंही घडलं असतं, जर हे सगळे लोकं सोबत नसते आले. तर, एकनाथ शिंदेंचं सामाजिक-राजकीय जीवन आहे, इतक्या वर्षांची पुण्याई समाप्त करण्यात आली असती. पण, त्यांनी याचा विचार केला नाही, त्यांनी हे ठरवलं की मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे, अशा शब्दात फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केली.