शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत
By अजित मांडके | Published: June 15, 2023 05:59 PM2023-06-15T17:59:04+5:302023-06-15T18:00:05+5:30
शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत
ठाणे : सुट्टी संपल्यानंतर गुरुवार पासून ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातील शाळांची पहिली घंटा वाजली. नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावर काहीसा आनंद दिसत होता. तर नवीन प्रवेश घेऊन शाळेत येणाºया विद्यार्थ्यांचे देखील काही शाळांना अनोख्या पध्दतीने स्वागत केल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत हजेरी लावल्याचे दिसून आले. परंतु अनोख्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचे कुतुहल वाटत होते.
शासनाच्या नव्या अभ्यासक्रमानुसार आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे देखील कमी झाले आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी काही शाळांनी विद्यार्थ्यांनी दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल याबाबतचे मार्गदर्शन देखील केल्याचे दिसून आले. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर गुरुवार पासून शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावर एक वेगळाच उत्साह जाणवत होता. पण नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी पहिला दिवस रडूनच घालवल्याचे चित्र दिसत होते.
दुसरीकडे महापालिका हद्दीतील नौपाडा विभागातील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिला दिवस ज्येष्ठांच्या आशीवार्दाने सुरु केल्याचे दिसून आले. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस कायम विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहावा यासाठी शाळा व्यवस्थापकांकडून शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही विविध शाळांमध्ये अशाचप्रकारे उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील बहुतांश शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती असल्याची माहिती शाळा व्यवस्थापकांमार्फत देण्यात आली.
ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेत पहिला दिवस असल्यामुळे वर्गखोल्या सजविण्यात आल्या होत्या. तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. तर, बेडेकर विद्यालयातही शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिला दिवस विद्यार्थ्यांना कंटाळवाणी जाऊ नये यासाठी शाळा मध्यांतर पर्यंतच भरविण्यात आल्या होत्या. त्यामध्येही काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शहरातील काही शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खेळ तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले होते.
सरस्वती शाळेत पहिला दिवस ज्येष्ठांच्या आशीवार्दाने सुरु
नौपाडा भागात असलेल्या सरस्वती विद्यामंदिर शाळेतील माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी ढोल- ताशा गजरात पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत पहिला दिवस असल्यामुळे त्यांचा हा दिवस ज्येष्ठांच्या आशीवार्दाने सुरु व्हावा असा संस्थेचा संकल्प होता. त्यासाठी संस्थेशी निगडित ज्येष्ठ नागरिक या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. तसेच १९५२ सालच्या बॅचचे दिलीप मुळे हे शाळेचे माजी विद्याथीर्ही यामध्ये सहभागी झाले होते. तर, संस्थेचे माजी कार्यकारी विश्वस्त अशोक टिळक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
महापालिका शाळेतही विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत
ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे देखील गुरुवारी अनोख्या पध्दतीने स्वागत झाले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती चॉकलेट तर काही ठिकाणी पुष्प देण्यात आले. तसेच शाळेत हजर झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पुस्तके देण्यात आली.