पाण्यासाठी ठामपाचे माजी विरोधीपक्ष नेते पठाण यांचे आयुक्तांच्या दालनाबाहेर बसून आंदोलन
By जितेंद्र कालेकर | Published: June 7, 2024 04:50 PM2024-06-07T16:50:31+5:302024-06-07T16:51:17+5:30
हजारो नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा.
जितेंद्र कालेकर, ठाणे: ठाणे, मुंब्रा - कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडले जात नसल्याने संतप्त झालेले माजी विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू) पठाण यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच शुक्रवारी आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा , कौसा परिसरात गेली चार दिवस पाणीपुरवठाच केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकर पाचारण करावे लागत आहेत. त्याविरोधात पठाण आक्रमक झाले हाेते. शुक्रवारी त्यांनी पालिका मुख्यालयात धडक देऊन आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदाेलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासनही दिले.
यावेळी पठाण म्हणाले की, ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात केली असली तर ९० टक्के पाणीपुरवठा केला जात नाही. गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंब्रा - कौसा भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसात सुमारे ५० लाख रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ठामपाचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत. तसेच टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांची छळवणूक होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. येत्या सोमवारपर्यत पाणीपुवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांच्या घरासमोर दहा हजार नागरिकांसह आंदोलनाला बसू, असा इशाराही पठाण यांनी दिला.
शटडाउन लांबल्यामुळे उद्भवली समस्या-
‘ एमआयडीसीने ४ जून रोजी काही कामांसाठी मुंब्रा भागासाठी शटडाऊन घेतला होता. हे काम ५ जूनला संपणे अपेक्षित होते. परंतू, ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जूनला दुपारी २.३० वाजता संपले. त्यानंतर पाणी पुरवठा सुरु केला. मात्र, शटडाऊन नंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे शुक्रवार (७ जून पासून ) पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. शटडाऊन २४ तासांचा असला तरी त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हीच समस्या होती. ती आता सुटली आहे.’ विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा.