ठाण्यातील गडकिल्ले प्रतिकृती विजेते धडकले ईगतपुरीच्या किल्ले त्रिंगल वाडीच्या किल्यावर!
By सुरेश लोखंडे | Published: December 26, 2023 06:49 PM2023-12-26T18:49:38+5:302023-12-26T18:53:01+5:30
ठाण्यातील या गडकिल्ले प्रेमीं प्रतिकृती स्पर्धेचे हे यंदाचे १३ वे वर्ष आहे.
ठाणे : येथील महापालिकेचे माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि माजी नगरसेविका रुचिता मोरे यांनी त्यांच्या प्रभागामधील गडकिल्ले प्रेमींसाठी गडे किल्ले बनविण्याची स्पर्धा घेतली होती. त्यातील विजेत्या स्पर्धकांना त्यांनी थेट ईगतपुरीच्या जवळील किल्ले त्रिंगल वाडी या किल्ल्याची सफर करवली, असे आयोजक मोरे यांनी लोकमतला सांगितले.
ठाण्यातील या गडकिल्ले प्रेमीं प्रतिकृती स्पर्धेचे हे यंदाचे १३ वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी.महाराजांचा इतिहास मुलांना समजावा यासाठी प्रत्येक वर्षी स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा महाराजांच्या गड किल्ल्यावरती करण्यात येतो. त्यानुसार आज रात्री हा किला या विजेत्यांनी सर केला आहे. यंदाच्या दिवाळी सुट्टीत प्रभागातील अनेक मुलांनी आणि मंडळांनी एकत्र येत किल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३०० स्पर्धकांना आज सकाळी बसने मोफत नेण्यात आले. तेथे गेल्यावर प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, उत्कृष्ट बांधणी, अपरिचित दुर्ग आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, ऐतिहासिक पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
सलगच्या तीन दिवस सुट्यांमुळे अनेक पर्यटक पर्यटनाला बाहेर पडल्यामुळे किल्ल्यापर्यंत पोचायला प्रचंड ट्रॅफिक लागली. किल्ल्यावर पोचायला साधारण दुपार झाली. मुलांनी जोषात किल्ला सर करायला सुरुवात केली, तोपर्यंत संध्याकाळ झाली. किल्ल्यावर असलेल्या जैन लेणी येथे पारितोषिक वितरण समारंभ संध्याकाळच्या मावळतीला संपन झाला. हळुहळू अंधार व्हायला सुरुवात झाली. तरीही, सर्वच मुलं उत्साही होती. सर्व मुलांच्या चेह-यावर आनंद घेत रात्रीच्या गडद अंधारात चांदण्याच्या प्रकाशात मुलं किल्ल्यावरुन खादी सुखरुप उतरली. इगतपुरी येथील त्रिंगल वाडी किल्ल्याचा इतिहास शिल्पा परब यांनी यावेळी सांगितला. बालशाहिर सौजस मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.