दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील चौथा आरोपीही जेरबंद; श्रीनगर पोलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: November 24, 2022 09:02 PM2022-11-24T21:02:26+5:302022-11-24T21:02:36+5:30
दरोडयाच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील थॉमस डॅनिय या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुरुवारी दिली.
ठाणे: दरोडयाच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील थॉमस डॅनिय या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुरुवारी दिली. या आरोपींवर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून दरोडयाच्या सामुग्रीसह तीन वाहनेही जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
वागळे इस्टेट रोड क्रमांक १८ येथे श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या पथकाने १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास दरोडयाच्या तयारीतील सात जणांच्या टोळीपैकी नवीन सिंग, चंद्रकांत पुजारी आणि विश्वजीत डांगळे या तिघांना अटक केली होती. या धुमश्वक्रीत त्यांचे इतर चौघे साथीदार पसार झाले होते. त्यांच्यापैकी थॉमस यालाही जेरबंद करण्यात आल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. आधी या टोळीकडून दोन वाहने आणि चाकूसह दरोडयाची सामुग्री जप्त केली होती.
आता चौथा साथीदार थॉमस याला अटक केल्यानंतर आणखी एक वाहनही जप्त केले आहे. त्याने ही मोटारकार कर्नाटकातून चोरल्याचीही बाब समोर आली. आता अन्य आरोपींच्या शोधासाठी कर्नाटक आणि केरळमध्येही पोलिसांचे आणखी एक पथक पाठविण्यात आले आहे. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र आणि कर्नाटकात चोरी आणि जबरी चोरीचे आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. चौघांनाही २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.