लेक लाडकी योजनेतून गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळणार
By नितीन पंडित | Published: October 13, 2023 04:55 PM2023-10-13T16:55:02+5:302023-10-13T16:55:32+5:30
लेक लाडकी योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या कोणत्याही मुलीच्या शैक्षणिक प्रगतीत आर्थिक अडचण येणार नाही
भिवंडी: राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली लेक लाडकी योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा नवा तुरा खोवला गेला असून महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील असंख्य गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळणार आहे असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या भिवंडी शहाराध्यक्षा सुनीता यशवंत टावरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला असून हि योजना लागू केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे भाजप भिवंडी महिला संघटनेच्या वतीने टावरे यांनी जाहीर आभार मानून या निर्णयाचे स्वागत करून उपमुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन देखील केले. दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही योजना जारी करून देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पाची पूर्तता केली असल्याचेहि टावरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा पद्धतीने मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ या लेक लाडकी या योजनेतून मिळणार असल्याची माहिती यावेळी महिला शहाराध्यक्षा सुनीता टावरे यांनी दिली असून १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार असून दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास त्यापैकी १ मुलगी किंवा दोन्ही मुली असल्यास दोघींना या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती यावेळी सुनीता टावरे यांनी दिली.
लेक लाडकी योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या कोणत्याही मुलीच्या शैक्षणिक प्रगतीत आर्थिक अडचण येणार नाही तसेच राज्यातील लेकींना आत्मनिर्भऱ करणारी ही दूरदर्शी योजना आखल्याबद्दल राज्यातील महिलावर्गाच्या वतीने आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करते असेही टावरे यांनी यावेळी स्पष्ट केले.