अनाथाश्रमातील मुलीला मिळाला ‘एमबीबीएस’ला प्रवेश; राजेश नार्वेकर यांनी केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 08:46 PM2022-02-14T20:46:01+5:302022-02-14T20:46:49+5:30
चार वर्षांची असल्यापासून बदलापूर येथील बॉम्बे टीन चँलेंज येथे शबाना शेख ही राहत होती.
ठाणे- अनाथ प्रमाणपत्राचा लाभ घेऊन औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळविलेल्या शबाना शेख हिचे आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील काळात कोणतीही अडचण आल्यास आपण तुझ्यासोबत आहोत, अशा आश्वासक शब्दांत तिचे मनोधैर्य वाढविले.
चार वर्षांची असल्यापासून बदलापूर येथील बॉम्बे टीन चँलेंज येथे शबाना शेख ही राहत होती. तिचे पालक नसल्यामुळे संस्थेत राहून तिने शिक्षण पूर्ण केले. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कु. शबाना हिस अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले होते. कु. शबाना हिने कष्टाने इयत्ता बारावीची परीक्षा दिली व त्यात यश मिळविले. त्यानंतर तिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी ‘निट’ची परीक्षाही पास झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तिने अनाथ कोट्यातून अर्ज केला होता. तिला औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.
तिच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी कु. शबाना हिस पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून शुभेच्छा दिल्या.
नार्वेकर म्हणाले की, औरंगाबाद येथील शिक्षण काळात काहीही मदत लागल्यास हक्काने सांग आम्ही तुला मदत करू. तुझ्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी होईल, असे ध्येय ठेव. अंबरनाथमध्ये डॉक्टरांची गरज आहे. शिक्षणानंतर तेथे सेवा देण्याचा विचार कर, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बालकल्याण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, बॉम्बे टीन चँलेंज संस्थेच्या अधिक्षिका पद्मजा गुडे, बालसंरक्षण अधिकारी पल्लवी जाधव आदी यावेळी उपस्थित होते.