मुलीचा विनयभंग करणाऱ्यास जमावानेच पकडले; पोक्सो अंतर्गत कारवाई, कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Published: August 20, 2024 11:46 PM2024-08-20T23:46:02+5:302024-08-20T23:46:18+5:30
आरोपीला याप्रकरणात अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक पोपट नाळे हे अधिक तपास करीत आहेत.
ठाणे : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कंपाउंड मधील गार्डनमध्ये एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या प्रदीप नारायण शेळके (४२, रा. विटावा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी मंगळवारी दिली. त्याला २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोलकत्यामधील आर.जी. कार मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या घटनेचा देशभर निषेध व्यक्त होत असतानाच कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या या अल्पवयीन मुलीचा १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास प्रदीप याने रुग्णालयाच्या कंपाउंड मधील गार्डनमध्ये विनयभंग केला. हा प्रकार लक्षात येताच काही दक्ष नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला चोप देत कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम खाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला याप्रकरणात अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक पोपट नाळे हे अधिक तपास करीत आहेत.
निदर्शनानंतर घडला प्रकार
कोलकत्ता येथील घटनेचा निषेध करण्यासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी १८ ऑगस्ट रोजी तीव्र निदर्शने केली होती. त्याच आवारात हा प्रकार निदर्शनास आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.