Aditya Thackeray: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच, मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंचं भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 03:27 PM2022-07-21T15:27:15+5:302022-07-21T15:28:15+5:30
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आज भिवंडीमधून सुरुवात झाली. यावेळी, राजकीय सत्तानाट्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.
ठाणे/मुंबई - "मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? असे म्हणत शिवसेना नेते आमदारआदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून बंडखोरांवर हल्लाबोल केला. यावेळी, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकीतही त्यांनी केलं.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आज भिवंडीमधून सुरुवात झाली. यावेळी, राजकीय सत्तानाट्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे आदित्य यांच्या स्वागताला दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेच उपस्थित होते. यावेळी, भाषण करताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह इतरही बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हटले. तसेच, हे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असून एकदिवस कोसळणार म्हणजे नक्कीच कोसळणार, असेही ते म्हणाले.
खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही, असे म्हणत आदित्य यांनी शिवसंवाद यात्रेतून भिवंडीतील शिवसैनिकांशी संवाद साधला. बंडखोर आमदार-खासदारांवर टिका करताना हे सरकार कोसळणार असल्याचं भाकीतही त्यांनी केलं.
उद्धव साहेबांसारख्या चांगल्या लोकांसाठी राजकारण आहे हे तुम्ही दाखवून द्या. आपल्यासोबत गद्दारी झाली, ही राजकीय गद्दारी नाही. ही माणुसकीशी गद्दारी झाली आहे. ज्या मिनिटाला पक्षप्रमुख हॉस्पिटलमध्ये जातात, दोन ऑपरेशन झाले आहेत. ज्या आठवड्यात ते बेडवरून हलू शकत नव्हते. दोन महिने ते कुणाला भेटू शकले नाहीत. तरीही मंत्रिमंडळाची कामं व्हॉट्सअपवर, फोनवर करत होते. गद्दारांची वृत्ती कशी असते बघा.. ते बेडवर असताना यांच्या डोक्यात मी मुख्यमंत्री होऊ शकतो का हे विचार आले, यासाठी हालचाली सुरू झाल्या. याला निष्ठावंत म्हणतात का? आज बाळासाहेब ठाकरे किंवा दीघे साहेब असते तर यांना काय न्याय दिला असता? असा सवाल आदित्य यांनी ठाण्यात जाऊन विचारला.
हे घाबरणारे नाहीत, शिवसैनिक आहेत
एकनाथ शिंदे आणि त्यांचे मित्र बसलेत दिल्लीत. महाराष्ट्रात पूर आलाय. तिकडून त्यांची वेगळीच कामं सुरु आहेत. युवासेनेला धमकी द्या, कुणी येतंय का पहा. महिला आघाडीला धमकी द्या, कुणी येतंय का पहा.. पण माझ्यासमोर उभे राहिलेले कुणी घाबरत नाहीत. हे शिवसैनिक आहेत. घाबरणारे असते तर सूरतेला, गुवाहटीत आले असते, अशा शब्दात आदित्य यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर तोफ डागली.
दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेसाठी शहापूर, इगतपुरी येथून नाशिकला रवाना होणार आहेत. शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मनमाड मधील मेळाव्यापासून होईल. यानंतर येवला, वैजापूर येथेही युवासैनिकांशी संवाद साधणार आहेत.
शिर्डीत करणार समारोप
औरंगाबाद येथे 'शिव संवाद' यात्रेला आदित्य ठाकरे संबोधित करतील. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधतील. पैठण, गंगापूर, नेवासा येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर शिर्डी मध्ये शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील सभांना शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्यानंतर त्यांची शिवसंवाद यात्रा आजपासून महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी सुरु होणार आहे.