विधान परिषदेच्या निवडणुकीत  महायुतीने खरे नरेटिव्ह तयार करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

By जितेंद्र कालेकर | Published: June 16, 2024 10:50 PM2024-06-16T22:50:10+5:302024-06-16T22:50:20+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा रविवारी सायंकाळी पार पडला.

The Grand Alliance should create a true narrative in the Legislative Council elections; Appeal by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis | विधान परिषदेच्या निवडणुकीत  महायुतीने खरे नरेटिव्ह तयार करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

विधान परिषदेच्या निवडणुकीत  महायुतीने खरे नरेटिव्ह तयार करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

ठाणे : लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचे खरे नरेटिव्ह तयार करून विजय मिळवावा. त्यासाठी या निवडणुकीची महत्वाची भूमिका असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. लोकसभेनंतर होणारी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे, असे या मेळाव्यात नमूद करून महायुतीच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहता कार्य करण्याचे आवाहन केले. महायुतीच्या कोकणातील कार्यकर्त्यांच्या ताकदीने निरंजन डावखरे यांच्यासह महायुतीच्या मुंबईतील दोन व नाशिकच्या उमेदवारांचाही मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा रविवारी सायंकाळी पार पडला.  या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, हेमंत सवरा, आमदार मंदा म्हात्रे, रमेश पाटील, गीता जैन, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रशांत ठाकूर, मनिषा कायंदे, माजी खासदार आनंद परांजपे, राजेंद्र गावित, माजी आमदार रविंद्र फाटक, संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, मनसेचे पदाधिकारी अभिजीत पानसे, अविनाश जाधव, आरपीआयचे भास्कर वाघमारे, भाजपाचे संजय वाघुले, शिवसेनेचे गोपाळ लांडगे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

या वेळी कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे संकल्पपत्र असलेल्या `व्हिजन डॉक्युमेंट'चे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले असले, तरी राज्यात महायुतीला लक्षणीय मते मिळाली. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाली. आता या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाची कामे जनतेपर्यंत पोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच लोकसभा निवडणुकीत काही एनजीओंनीही महाविकास आघाडीच्या साह्याने नरेटिव्ह निर्माण केले. मोदी द्वेषाने पछाडलेल्या काही एनजीओंमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले आहेत, असा आरोप  शिंदे यांनी केला. आमदार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून, कोकणाने त्यांना तडीपार केले. कोकणातील साडेसहापैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या. आता या निवडणुकीतही महायुतीला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आमदार निरंजन डावखरे यांनी १२ वर्षांत पदवीधरांबरोबरच विविध विकासकामे केली. त्याचबरोबर विद्यार्थीभिमुख भूमिका घेऊन विविध प्रश्न सोडविले. विधिमंडळातही ते सतत प्रश्न मांडण्यात आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन फडणवीस यांनी करून पुन्हा डावखरेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
मुंबईतील दोन, कोकण आणि नाशिकमध्ये भाजपासह महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चारही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
 

Web Title: The Grand Alliance should create a true narrative in the Legislative Council elections; Appeal by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.