ठाण्यातील कोणत्याही आपत्तीत तात्काळ मदतकार्श सज्ज ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
By सुरेश लोखंडे | Published: July 20, 2023 05:04 PM2023-07-20T17:04:11+5:302023-07-20T17:04:30+5:30
ठाणे : जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेने ...
ठाणे : जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. जनतेला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. या बैठकीपूवीर् तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
रायगडमधील इर्शाळगड दुर्घटना आणि राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाची तातडीने आढावा बैठक घेऊन ते सातत्याने जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त असतानाही त्यांनी आज जिल्हा प्रशासन, महापालिका/ नगरपालिका आयुक्त, पोलीस विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीची त्यांनी झाडाझडती घेतली. संभाव्य आपत्ती रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आणि पूर्ण वेळ सतर्क राहण्याचे निर्देश यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.
या जिल्हा आपत्ती निवारण आढावा बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसिलदार संजय भोसले आदी जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाले होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व संबंधित इतर विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाऊस, नद्यांची पातळी, पाणी भरण्याची ठिकाणांची स्थिती,धोकादायक इमारतीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला. धोकादायक इमारतींमध्ये राहणारे, दरडप्रवण आणि डोंगरी भागातील, लो लाइन एरियातील नागरिकांशी प्रशासनाने सतत संपर्कात राहावे. आवश्यकता भासल्यास तेथील नागरिकांना संक्रमण शिबिरात अथवा सुरक्षित स्थळी हलवावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
जिल्हा प्रशासनातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपत्ती काळात फिल्डवर तातडीने उपस्थित राहावे. महापालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी हे सुद्धा त्यांच्या कर्तव्यस्थळावर उपस्थित असतील, याची खात्री संबंधित महापालिका आयुक्तांनी करावी. पोलिसांनी अतिवृष्टीच्या काळात रात्रीची गस्त वाढवावी. एखाद्या ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास, काही मदत लागल्यास त्या ठिकाणी तातडीने पोहोचावे. कोणत्याही क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.