हातभट्टी उद्ध्वस्त करणाऱ्या हातांची झाली पुस्तकांशी गट्टी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यात उभारले ग्रंथालय
By जितेंद्र कालेकर | Published: February 21, 2024 08:59 PM2024-02-21T20:59:45+5:302024-02-21T21:00:06+5:30
कर्मचाऱ्यांच्या योगदानातून अशा प्रकारे उभे राहिलेले हे पहिलेच ग्रंथालय ठरले आहे.
ठाणे : अवैध दारु निर्मिती किंवा विक्री करणाऱ्यांच्या मानगुटी भोवती कारवाई करिता गच्च आवळल्या जाणाऱ्या हातांनीच सढळ हस्ते योगदान देऊन एक हजार ग्रंथसंपदा असलेल्या ग्रंथालयाची निर्मिती केली. ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १२५ अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधीक्षक डाॅ. नीलेश सांगडे यांच्या संकल्पनेतून मुख्यालयात हे वाचनालय सुरु केले. कर्मचाऱ्यांच्या योगदानातून अशा प्रकारे उभे राहिलेले हे पहिलेच ग्रंथालय ठरले आहे.
अवैध मद्यसाठ्यावर एखादी कारवाई केल्यानंतर त्यातील आरोपींवर योग्य प्रकारे कारवाई व्हावी, त्याचे सक्षम ज्ञान कर्मचाऱ्यांकडे असावे तसेच कर्मचाऱ्यांनी रिकाम्या वेळेत पुस्तके वाचून आपले ज्ञान अद्ययावत करावे, या उद्देशाने ठाण्याचे अधीक्षक डॉ. सांगडे यांनी हे वाचनालय सुरु करण्याची संकल्पना मांडली. काेपरीतील अधीक्षक कार्यालयात पहिल्या मजल्यावर हे वाचनालय सुरूवातीला मोजक्या पुस्तकांच्या संचातून सुरु झाले. कर्मचाऱ्यांना विविध कायदे, जीआरची माहिती व्हावी यासाठी लागणाऱ्या पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.
या ग्रंथालयातील पुस्तकांची बुद्धी संपदा राज्यभरात कौतुकास पात्र होत आहे. ‘ वाचाल तर वाचाल’ या मंत्राला अनुसरून सांगडे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सुसज्ज ग्रंथालय अलीकडेच सुरु केले. या ग्रंथालयात अधिकारी, कर्मचारी पुस्तकांचा आस्वाद घेतात. आपला कर्मचारी कायद्याचा उत्तम अभ्यासक असावा, समाजामधील अपप्रवृत्तीवर वचक असावा. कर्मचाऱ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याच्या ज्ञानात भर पडावी या हेतूने या ग्रंथालयाची उभारणी केल्याचे डॉ. सांगडे यांनी सांगितले. या ग्रंथालयात मुंबई दारूबंदी कायदा, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती / जमाती प्रतिबंध कायदा, बाल न्यायालय अधिनियम, आयपीसी, सीआरपीसी आदींसह बहुतांश सर्व प्रकारच्या कायद्यांची पुस्तके उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांना ग्रंथालयात बसूनच निशुल्क ही पुस्तके अभ्यासता येणार आहेत. काही पुस्तकप्रेमींनी या ग्रंथालयाला पुस्तकांचे दान दिले. शासकीय निधी शिवाय हे ग्रंथालय उभे केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या ग्रंथालयाचे कौतुक केले.
‘ ग्रंथालयात विविध कायद्याच्या पुस्तकांबराेबर गाजलेल्या कादंबऱ्या आणि सर्व प्रकारची शासकीय परिपत्रके ही उपलब्ध आहेत. या परिपत्रकांचा संग्रह करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागला. सध्या एक हजारांहून अधिक पुस्तके याठिकाणी असून आणखी एक हजार पुस्तकांचा संग्रह केला जाणार आहे.’
डॉ. नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे.