फेरीवाल्यांनी केली ४ महिन्याच्या गरोदर तोरण विक्रेत्या महिलेस मारहाण
By धीरज परब | Published: November 13, 2023 11:09 PM2023-11-13T23:09:02+5:302023-11-13T23:09:37+5:30
राजा ह्याची मुलगी रविना मदेशिया ( २१ ) हिने माछी हिला शिवीगाळ करत हा आमचा एरिया असून इकडे फक्त आम्हीच धंदा लावतो
धीरज परब / मीरारोड - मीरारोड मध्ये फेरीवाल्यांच्या गुंडगिरीचा आणखी एक प्रकार घडला असून फेरीवाल्यांनी दिवाळी निमित्त तोरण विकणाऱ्या ४ महिन्याच्या गरोदर महिलेस सार्वजनिक जागेच्या वादातून जबर मारहाण केली. मीरा रोड पूर्वेला रेल्वे स्थानक जवळ टपाल कार्यालय शेजारी गावदेवी नगर असून तेथे रविना माछी ( २८ ) ह्या पती मनोज व दोन मुलांसह राहतात . दिवाळी सणात त्या दरवर्षी फुलांचे तोरण बनवून विक्री करतात . त्या माया ज्वेलर्स जवळील फरसाण दुकाना समोर तोरण विक्री करत होत्या. त्यांच्या शेजारीच राजा मदेशिया व कुटुंबाने रांगोळी विक्रीची हातगाडी लावली होती .
राजा ह्याची मुलगी रविना मदेशिया ( २१ ) हिने माछी हिला शिवीगाळ करत हा आमचा एरिया असून इकडे फक्त आम्हीच धंदा लावतो , तू दुसरीकडे धंदा लाव असे सांगून तिचे सामान फेकून दिले . तिने माछी हिच्या अंगावर धावून जात तिला खाली पाडले व मारहाण करू लागली . तिचे वडील राजा मदेशिया ह्याने लाथाबुक्क्यांनी मारले शिवाय त्याची पत्नी प्रेमा , मीना आणि अन्य दोन - तीन महिलांनी येऊन माछी हिला मारले . तिचा पती मनोज हा वाचवण्यासाठी आला असता त्याला सुद्धा मारहाण केल्याचे रविना माछी हिने नया नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . पोलिसांनी रविवारी १२ नोव्हेम्बर रोजी रविना मदेशिया , राजा मदेशिया , प्रेमा मदेशिया , मीना सह अन्य दोन - तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे .
तर रविना मदेशिया हिने दिलेल्या फिर्यादी नुसार तोरणचा धंदा लावल्या वरून वाद होऊन माछी दाम्पत्याने शिवीगाळ , मारहाण केली व मनोज याने विनयभंग केला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . काही दिवसां पूर्वी शांती नगर मध्ये एका दुकानदारास फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती . सार्वजनिक रस्ते - पदपथ वर धंदा करण्यासह जागेचा हक्क सांगण्यावरून भांडणे , मारामाऱ्या वाढत आहेत .