ठाणे स्टेशन आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब

By अजित मांडके | Published: October 6, 2022 04:07 PM2022-10-06T16:07:03+5:302022-10-06T16:08:16+5:30

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढताना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

The hawkers at Thane station and railway bridge disappeared | ठाणे स्टेशन आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब

ठाणे स्टेशन आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब

Next

ठाणे - ठाणे स्टेशन फेरीवाला मुक्त राहील असा दावा महापालिकेकडून केला जात होता. मात्र या फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा या भागात वाढल्याचे दिसून आले आहे. याच फेरीवाल्यांचा फटका एका ५२ वर्षीय महिलेला बसला. फेरीवाल्यांकडून त्यांना मारहाण झाल्याची घटना पुढे आली. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच, स्टेशन परिसरातील आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेने आता रेल्वे पोलिसांकडून या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे बोलले जात आहे. मात्र फेरीवाल्यांना पाठीशी घातले जात असल्याने पुन्हा त्यांची मजल वाढल्याचेच दिसून आले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढताना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरानंतर दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा ठाण्यात वाढतांना दिसत आहे. कोरोनाच्या काळात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांना आपली दोन बोटे गमवावी लागली होती. त्यानंतर आणखी एका घटनेत फेरीवाल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांवर चाकू घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. 

घटनेनंतर फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली गेली होती. तसेच स्टेशन परिसर देखील फेरीवालामुक्त करण्यात आला होता. परंतु आता नवरात्रोत्सवाच्या काळात स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. सॅटीसखाली आणि वरील बाजूस देखील फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्याचे चित्र दिसून आले आहे. पालिका कारवाई करण्यासाठी येत असतांना त्याची माहिती अगावू स्वरुपात या फेरीवाल्यांना दिली जात असल्याने फेरीवाल्यांना पाठीशीच घालण्याचा प्रकार आजही शहरात सुरु असल्याचेच दिसत आहे.

सर्वसामान्य ठाणेकरांनाही त्याचा फटका आता बसू लागला आहे. त्यातूनच महिलेवर फेरीवाल्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याचे दिसून आले आहे. रविवारी ही घटना घडल्यानंतर दोघांना अटक करण्यात आले असले तरी देखील फेरीवाल्यांचा माज मात्र काही कमी झाल्याचे दिसत नाही. आता या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अचानक या परिसरातील फेरीवाले गायब झाले असून नागरीकांना येथून चालण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुरुवारी सॅटीसखाली काही तुरळक फेरीवाले दिसत होते. मात्र रेल्वेच्या पुलावर एकही फेरीवाला दिसून आला नाही. परंतु केवळ हल्ला झाल्यावरच ही कारवाई फेरीवाल्यांवर होणार आहे का? त्यांच्यावर कायमचा अंकुश कोण बसविणार असा सवाल आता ठाणेकर करीत आहेत.


 

Web Title: The hawkers at Thane station and railway bridge disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे