मीरारोडच्या शांती नगरमधील फेरीवाल्यांचा पालिका पथकावर हल्ले सुरूच
By धीरज परब | Published: January 6, 2024 06:22 PM2024-01-06T18:22:24+5:302024-01-06T18:22:39+5:30
मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ ...
मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ फेरीवाल्यांवर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरीवाल्यांचे पालिका पथकावर होणारे हल्ले म्हणजे गुंडगिरी असून त्यांच्या विरोधात पालिकेसह पोलिसांनी देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी एका वृद्ध दुकानदारास दुचाकी उभी करण्यावरून केलेल्या मारहाणी नंतर स्थानिक दुकानदार व नागरिकां मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दलचा संताप उफाळून आला. तेव्हापासून आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आदींनी देखील ह्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी चालवली आहे.
शांती नगर मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दल स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. आंदोलने देखील झाली आहेत. परंतु ह्यातून चालणारे मोठे अर्थपूर्ण कारणामुळे फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नव्हती. पण दुकानदारास मारहाणीच्या घटनेनंतर नागरिक, व्यापारी, आमदार व राजकारणी आदींनी कारवाईची आग्रही मागणी केल्याने पालिका नियमित कारवाई करू लागली आहे.
महापालिकेवर विविध स्वरूपाचे आरोप करणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले धंदे लावण्यास सुरवात केली असता तक्रारी होऊन महापालिका सुद्धा प्रतिबंधात्मक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी थोडेफार प्रयत्न करू लागली आहे . त्यातूनच ३ जानेवारी रोजी कारवाईसाठी आलेल्या प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह पालिका कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला . सरकारी कामात अडथळा आणला. त्या रात्री नया नगर पोलिसांनी अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुन्वर मिरझा ह्या ६ जणांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
४ जानेवारी रोजी देखील अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह पालिका पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला. तेथील रुपाली साडी सेंटर जवळ फेरीवाल्यांनी अनधिकृत रित्या जमाव गोळा करून चव्हाण यांच्या सह संबंधित अधिकारी - कर्मचारी यांना विरोध केला. फेरीवाल्यांनी कारवाई बंद पडून अधिकारी - कर्मचारी यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला.गणेश दीनानाथ यादव, अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुनावर मिरझा ह्या ७ जणांवर व अन्य १० फेरीवाल्यांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.